Marmik
हिंगोली कानोसा

हिंगोली विधानसभा निवडणूक: उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये चुरस; अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

हिंगोली – राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवकाश असला तरी हिंगोलीतील अनेक जणांनी या मतदार संघात आपणच उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधले आहे असे दिसते. तसेच काहींनी तर सोशल मीडियातून तसेच जाहिरात बाजी करून निवडणुकीच्या रिंगणात आपणच असल्याचे दंड थोपटले आहेत. हा सर्व प्रकार एकट्या काँग्रेस पक्षात सुरू असून उमेदवारी मिळण्यासाठी पक्षातील अनेक जण कंबर कसत असल्याचे दिसते.

हिंगोली लोकसभेवर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीला जिल्ह्यात ‘अच्छे दिन’ आल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी हुरूप आला असून महाविकास आघाडीतील एकट्या काँग्रेस पक्षातील जवळपास चार ते पाच जणांनी आपणच उमेदवार म्हणून जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पक्षातील अनुभवी मुरब्बी राजकीय नेते असलेले हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या विरोधातच जणू अप्रत्यक्षरीत्या मोर्चा उघडला आहे.

सध्या काँग्रेस मधील हिंगोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, शामराव जगताप, प्रकाश थोरात काँग्रेस पक्षाकडून आपणच उमेदवार असल्याचे समजून या मतदारसंघातून निवडणूक तयारीच्या कामाला लागले आहेत.

यातील काहींनी सोशल मीडियावर तसेच वृत्तपत्रातून जाहिरात बाजी करून आपणच भावी आमदार असल्याचेही मनोमन पक्के केले आहे तर काहींनी ‘वाल पेंटिंग’ द्वारे आपणच भावी आमदार असल्याचे घोषित केले आहे. एकूणच काँग्रेस पक्षात या विधानसभेतून तिकीट मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळणार असून पक्ष कोणास निवडणुकीच्या रिंगणात उतरवतो याकडे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

पक्ष ठरवेल कोणाला तिकीट द्यायचे ते – भाऊराव पाटील गोरेगावकर

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातून हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी चार ते पाच जणांनी निवडणूक प्रचार कामास सुरुवात केली आहे. आपणच उमेदवार असल्याचे सांगून भावी आमदार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. याबाबत काँग्रेसमधील मुरब्बी राजकीय नेते तथा हिंगोली विधानसभेचे प्रबळ उमेदवार माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता प्रकाशप्रकाश थोरात हे भाजपचे असून त्यांना कोणी लावून दिले असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच शामराव जगताप, सुरेश अप्पा सराफ आणि प्रकाश थोरात हे सर्वच आपणच उमेदवार असल्याचे सांगत आहेत. ग्रामपंचायत प्रमाणे पॅनल सारखी विधानसभेची निवडणूक अद्याप आलेली नाही. पक्षाकडून कोणाही एकालाच तिकीट मिळेल पक्ष ठरवेल कोणामध्ये किती ताकद आहे ते तोपर्यंत मजा घेऊ द्यायची असते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related posts

हिंगोली लोकसभा: भाजपचा उमेदवार कोण?

Gajanan Jogdand

हिंगोली, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागा वाटपाचा आज रात्री लागणार निकाल

Gajanan Jogdand

हिंगोली लोकसभा : महायुतीतील तीनही पक्षांकडून जोरदार हालचाली

Gajanan Jogdand

Leave a Comment