मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – तालुक्यातील वाघजाळी येथील एका शेतकऱ्याने कापसाचे बियाणे न आल्याने व संबंधित कंपनीने दोन महिन्यानंतर दुसरा नर लावा, असे सांगितल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याने अखेर गोंधणीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना 18 ऑगस्ट रोजी निदर्शनास आली. संबंधित पारस कंपनी विरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते.
विठ्ठल दत्ता तांबिले राहणार वाघजाळी तालुका सेनगाव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विठ्ठल तांबिले यांनी पारस कंपनीचा कापूस प्लांट घेऊन आपल्या शेतात लागवड केली होती, मात्र संबंधित कापसाला फुले आलीच नाहीत. त्यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींकडे याबाबत विचारणा केली असता आज दोन महिन्यानंतर पारस कंपनीच्या प्रतिनिधींनी नर जातीचे बियाणे भेसळयुक्त असल्याचे सांगून दुसरा नर लावा असे सांगितले.
पेरणीला दोन महिने झाल्यानंतर फुले कधी येणार कधी प्लांटची विक्री होणार, अशी चिंता या शेतकऱ्यास लागली होती. विठ्ठल तांबिले हे आधीच खर्चाने पुरते हैराण झालेले होते. त्यातच त्यांच्या आईस दवाखान्यात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च आला. त्यामुळे कर्जाचा डोंगर त्यांच्यावर होता. या प्लॉटच्या भरोशावर त्यांची पुढील उपजीविका होती.
तसेच त्यांच्या आईचा पुढील दवाखाना होणार होता. कापसाचे बियाणे न आल्याने आता संसाराचा गाडा कसा चालवायचा या विवंचनेतून विठ्ठल तांबिले यांनी शनिवारी रात्री आपल्या शेतातील गोंधणीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील प्रकार 18 ऑगस्ट रोजी सकाळी ग्रामस्थांच्या नजरेस आला.
ग्रामस्थांनी गोरेगाव पोलीस ठाण्यास कळविल्यानंतर पारस कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. आत्महत्या केलेल्या विठ्ठल तांबिले यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने गावावर शोककळा पसरली आहे.