गमा
महाराष्ट्रात बदलापूरची घटना ताजी आहे. या घटनेने राज्यातील जनसामान्यांची मने हे लावून गेली आहेत. विश्वास करावा तर कुणावर असा प्रश्नही निर्माण झाला आहे. बालकांना घरानंतर सुरक्षित जागा म्हणून शाळेकडे पाहिले जाते त्याच शाळेमध्ये अशा घटना घडत असल्याने सर्वच पालक अस्वस्थ होणे नैसर्गिकच. अशा घटना घडू नये म्हणून शासनाने पावले उचलली पाहिजेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते प्रकर्षाने समोर आणले पाहिजेत. यासाठी शिक्षकांना तशी धडे दिली पाहिजेत…
वरील घटनेच्या पार्श्वभूमीवर घरातून मुले शाळेत निघाल्यानंतर शाळेत पोहोचेपर्यंत, शाळेत आणि पुन्हा घरी येईपर्यंत प्रशासनातील महत्त्वाचा दुवा असलेला पोलीस प्रशासन विभाग करतोय काय असा प्रश्न सर्वसामान्यांना आवर्जून पडावा. यादृष्टीने हिंगोली जिल्हा आणि शहराचाही विचार व्हायला हवा.
हिंगोलीत पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरातील नागरिकांना विविध नियम न पाळल्याने काही रुपयांचा दंड लावला जात आहे. असा हा दंड लावण्यासाठी पोलीस कर्मचारी महामार्गावर आणि हिंगोली शहरासह विविध ठिकाणावरील चौकात तैनात करण्यात आले आहेत. या पोलिसांसमोरून विद्यार्थ्यांनी गच्च भरलेला शालेय ऑटो अथवा एखादी व्हॅन जात नसेल हे कशावरून? आणि त्या वाहनांची चौकशी केलीच जाते हेही कशावरून?
मागील काही पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर या प्रश्नासह हिंगोलीतील सिग्नलचा प्रश्न आवर्जून उपस्थित केला, पण त्याकडे नंतर सोयीस्करपणे दुर्लक्ष करून हे अधिकारी जिल्ह्याबाहेर बदलूनही गेले प्रश्न जैसे थे च राहिले आहेत. आताही या प्रश्नांकडे लक्ष देऊन ही प्रश्न सुटतील असे वाटत नाही.
पोलिसांना फक्त सर्वसामान्यांनी नियम पाळला नाही म्हणून फाईन लावून शासनास महसूल मिळवून देणे हाच उद्देश राहिला असल्याचे दिसते. ‘निर्भया’, ‘अभया’ आणि बदलापूरच्या घटनेच्या अनुषंगाने महिला, विद्यार्थिनी आणि शालेय बालके यांची सुरक्षा तेवढीच गरजेची आहेत. यासाठी जिल्हा पोलिसांनी पावले उचलणे गरजेचे आहे.
आपल्याकडे एखादी घटना घडल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते आणि सदरील घटनेतील पीडित मुलगी ही आपली नव्हती म्हणून समाधानही व्यक्त केले जाते असे कोणीतरी म्हटले आहेच, पण या प्रकारांनी मरते ती समाज म्हणून समाजातील माणुसकी आणि नीती – मूल्य.
जिल्हा पोलिसांनी शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेच्या सर्वच ऑटो, वाहनचालक यांना ड्रेस कोड, आयडेंटी कार्ड, वाहनात जीपीएस मशीन बसवणे, विद्यार्थी पायी सायकलवर शाळेत जात असतील तर त्यांची सुरक्षा यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत..
मुंबईत दोन-तीन महिन्याखाली महाकाय फ्लेक्स कोसळून त्याखाली अनेकांचा चिरडून मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर हिंगोली जिल्हा प्रशासनास मोठी जाग आली आणि त्यांनी असे अवैध फ्लेक्स आणि बॅनर उतरवून खाली घेतले. त्यानंतर मात्र आता पुन्हा अशा फ्लेक्स आणि बॅनरची तपासणी झाली काय हा प्रश्नही आवर्जून पडावा..