मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – आपण महात्मा गांधींचा जन्मदिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. या दिनाचे औचित्य साधून शासनाकडून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ हे घोषवाक्य निर्धारित केलेले आहे, पण शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीपात्रात आणि पात्रावरील मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून आला असून जागोजागी झाडाझुडपांवर त्याचे ढिगार साचले आहे. यामुळे पर्यावरण प्रदूषित झाले असून आपला स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता हीच का असा प्रश्न आता पडू लागला आहे.
जिल्ह्यात 2 ते 3 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होऊन कयाधू नदी 18 वर्षानंतर पात्र सोडून शेतकऱ्यांच्या शेतातून वाहिली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेच. खेरीज पाण्याच्या पुरासोबत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचराही नदी घेऊन आली आणि पाणी हा कचरा नदीपात्रातील झाडाझुडपात, शेतकऱ्यांच्या शेतात सोडून प्रवाहित झाले. हा कचरा एवढ्या मोठ्या प्रमाणात साचला आहे की, जागोजागी त्याचे ढिगार झाले आहेत.
कधीकाळी या नदीतून दूध वाहत असे, नदीकाठ हिरवळीने नटत असे. तसेच गवताच्या झाडाझुडपांच्या विविध प्रजाती तसेच जैवविविधता येथे होती, असा समज अनेकांचा आहे. तो जर रास्त असेल तर आपण नक्कीच नदीचे वाटोळे केले आहे.
भारतीय संस्कृतीच्या उदयास नद्यांचा वाटा मुलाचा आहे. किंबहुना नद्यांच्या अस्तित्वाशिवाय भारतीय संस्कृतीचे मूल्य शून्य, असा अभ्यासकांचा दावा तो रास्तही, पण हल्ली नद्यांचे प्रदूषण पाहिल्यावर आपणच आपल्या हाताने आपली ही संस्कृती गाढत आहोत असे कोणालाही वाटेल.
नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी कोणाची?
पुण्यातील मुळा – मुठा, असो पंढरपूरची चंद्रभागा असो, कृष्णा असो, नागपूरची नाग नदी असो या सर्व नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेले आहे. हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीचेही असेच झाले आहे. नदी बारमाही वाहत नसली तरी सांडपाणी मात्र नदीपात्रात 24 तास सोडले जाते नदीचे स्वच्छता नाहीच. शिवाय खोलीकरणही नाही आपण नदीच्या पाण्यावर हक्क सांगतो. मग नदीचे प्रदूषण थांबवणे अथवा रोखणे ही जबाबदारी ओळखली पाहिजे ही काळाची गरज आहे.