मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – आजवर प्रेम प्रकरणावर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत सत्य घटनेवर आधारित आणखी एक प्रेम कहाणी भर घालण्यास सज्ज होत आहे. ही प्रेम कहाणी म्हणजे ‘राजा राणी’ हा चित्रपट होय. जिवापाड प्रेम करणारे दोन जिवलग कायम एकत्र पाहायला मिळाले मात्र त्या दोघांमध्ये असं काय होतं ज्याने त्यांच्या नात्यात दुरावा येतो?
बरं हा दुरावा चित्रपटात संपलेला पाहायला मिळणार की एकमेकांचा जीव घेणार हे सारं पाहणं रंजक ठरणार असल्याचे दिसत आहे. १८ ऑक्टोबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून महाराष्ट्रात ३०० हुन अधिक चित्रपटगृहात आणि 400 हुन अधिक शो च्या माध्यमातून प्रदर्शित होणार असल्याचेही समोर आले आहे. ग्रामीण व सत्य प्रेमकहाणीवर आधारित असलेल्या चित्रपटाची सर्वत्र उत्सुकता रंगली आहे.
टिझरबरोबर चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांची मन जिंकली. ‘बुंग बुंग बुंगाट’, ‘थोडासा भाव दे’ , ‘नटून थटून आली नवरा नवरी’ ही गाणी साऱ्या रसिकांना थिरकायला भाग पाडत आहेत. चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे झळकणार असून सध्या ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात धुमाकूळ घालणाऱ्या गुलीगतचा दणकाही पाहायला मिळणार आहे.
सूरज आता सत्य घटनेवर आधारित उलगडणार्या या प्रेम कथेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सूरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा ‘राजा राणी’ हा चित्रपट १८ ऑक्टोबर 2024 पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.