मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – तालुक्यातील वटकळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी बनविण्यात आलेल्या खड्ड्यात पडून सहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील दोषी कंत्राटदार व ग्रामपंचायतचे संबंधित दोषी कोण हे समजू न शकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बनविण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. परंतु सदरील खड्डा रद्द झाला व हा खड्डा संबंधित कंत्राटदार व ग्रामपंचायत कार्यालयाच्या संबंधित दोषी व्यक्तींनी बुजविला नाही.
सेनगाव तालुक्यात माहिती द्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
21 जुलै रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान 6 वर्षीय आरुषी संदीप याताळकर (रा. मोहतखेड तालुका लोणार जिल्हा बुलढाणा, हं. मु.) वटकळी ही या खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मरण पावली.
सदर खड्डा बुजविण्यास संबंधित कंत्राटदार व ग्रामपंचायत कार्यालयातील दोषींनी हलगर्जी व निष्काळजीपणा केल्याने व या बालिकेच्या मरणास कारणीभूत झाल्याने त्यांच्यावर भादविनुसार सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेतील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेले नाही. घटनास्थळी सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे साहेब पोलीस उपनिरीक्षक यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास सेनगाव पोलीस करत आहेत.
दोन्ही आरोपींची नाव, गावे नाहीत
वटकळी येथे 6 वर्षीय चिमुर्डी आरुषी संदीप याताळकर या बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत असलेले जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकी साठी खड्डा खोदणारा कंत्राटदार आणि वटकळी ग्रामपंचायत कार्यालयाचे दोषी यांची नावे, गावे सेनगाव पोलिसांना समजू शकली नाहीत. खरे तर संबंधित काम हे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दिले जाते. आता ग्रामपंचायतीने किंवा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सदरील कामासाठी कोणत्या कंत्राटदाराला नेमले होते, हे काम कधी झाले याची सखोल चौकशी करून माहिती घेतल्यास आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतील.
तूर्त आरोपी कोण आणि कुठले हेच माहिती नसल्याने सेनगाव पोलिसात आरोपींच्या नाव गाव माहिती नसल्या प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.