मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार:-
हिंगोली – शहरातील नागरिकांच्या घरात घुसून महिलांचे दागिने जबरीने चोरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून जर बंद केला आहे. या आरोपीकडून 86 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात माला विरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे तसेच बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने आपल्या गोपनीय माहितगार सतर्क करून मालाविरुद्धच्या गुन्ह्या बाबत माहिती घेत होते.
गोपनीय बातमीदारामार्फत पथकास माहिती मिळाली की, 6 डिसेंबर 2023 रोजी नागोराव सुखदेव श्रीरामे (वय 26 वर्ष राहणार हनकदरी ता. सेनगाव जि. हिंगोली) हा कमला नगर हिंगोली येथील एका महिलेच्या घरात घुसून अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने जबरीने चोरून घेऊन गेला आहे, अशी माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर महिलेची भेट घेऊन विचारपूस केले असता घटनेत तथ्यता आढळून आली.
परंतु आरोपीने पीडित महिलेस पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादी महिलेने पोलीस ठाण्याला अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सदर महिलेला सुरक्षेबाबत विश्वास देऊन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
सदर प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची गोपनीय माहिती काढली असता सदर गुन्हेगार रेकॉर्डवरील असल्याचे समजले. त्यावरून आरोपी नागोराव श्रीरामे यास हिंगोली येथे लोखंडी तलवारसह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भादंविसह 4 / 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे नमूद आरोपीस विश्वासात घेऊन हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 949 / 2023 कलम 394 भादवी या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने काही दिवसापूर्वी कमलानगर, हिंगोली येथे एका महिलेस तिच्या राहत्या घरात घुसून तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने जबरीने चोरून नेल्याबाबत कबुली दिली.
त्याच्याकडून कानातल्या सोन्याच्या काड्या, गळ्यातील सोन्याची पोत, हातातील चांदीचे काकणे, एक अँड्रॉइड मोबाईल असा जबरीने चोरून नेलेला एकूण 86 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपी यापूर्वीही नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील पहेनी व घोटादेवी येथील महिलांच्या अंगावरील दागिने जबरीने चोरल्याबाबत व घरफोडीचे तसेच मुलींना पोलीस भरतीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजूसिंग ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र सावळे प्रशांत वाघमारे, इरफान पठाण यांनी केली.