मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – ऑनलाइन रमी मध्ये पैसे हरल्याने सदरील पैशाची नुकसान भरपाई म्हणून दुकान मालकास लुबाडण्याचा विचार करून जबरी चोरीची खोटी फिर्याद देणाऱ्या विरुद्ध तसेच सदरील कल्पना या फिर्यादीस देणाऱ्या दोघांविरुद्ध बासंबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
28 ऑगस्ट रोजी आरोपी नितीन पंजाबराव चिपाडे (वय 23 वर्ष रा. जोडतळा तालुका जिल्हा हिंगोली) यांनी बासंबा पोलीस ठाणे हद्दीत जोडतळा ते माळहिवरा जाणाऱ्या रोडने डेली नीड्सचा माल डिलिव्हरी करून घरी जात असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी रस्ता अडवून मारहाण करून 50 रुपये जबरीने चोरल्या बाबत बासंबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आला होता.
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी सदर फिर्यादीची पडताळणी करून फिर्याद दाखल करीत असताना काही बाबींवर संशय आल्याने फिर्यादीची सखोल विचारपूस केली.
यावेळी फिर्यादीने सांगितले की माझे 50 हजार रुपये हे ऑनलाईन रम्मी मध्ये हरलो असून डेली नीड्सचे मालक श्याम नैनवाणी यांची दिशाभूल करून पैसे वाचविण्यासाठी जबरी चोरीची खोटी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
सदरची खोटी फिर्याद देण्यासाठी त्याचे मित्र सतीश शंकर थोरात (वय 26 वर्ष) व अविनाश गौतम डोंगरदिवे (वय 28 वर्ष, दोन्ही रा. जोडतळा) यांनी सदरची कल्पना देऊन मदत केल्याचे निष्पन्न झाले.
या3वरून आरोपी नितीन पंजाबराव चिपाडे, सतीश शंकर थोरात व अविनाश गौतम डोंगरदिवे यांच्यावर भादंवि कलम 182, 34 प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गुलाब खरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस जबरी चोरीची खोटी फिर्याद देणे चांगलेच महागात पडले आहे.