मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील तळणी शिवारात शेळीचे पिल्ले चारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या खुनाचा गुन्हा घडला होता. सदरील गुन्हा चार वर्षानंतर उघड झाला असून आरोपीच्या ताब्यातून वृद्ध महिलेचा खून करून चोरलेले दागिने जप्त करून रेकॉर्डवरील आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखा व नरसी नामदेव पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे हिंगोली जिल्ह्यातील मालाविरुद्धचे व शरीराविरुद्धचे गुन्हे उघड करण्यासाठी प्रयत्न करत असतात.
नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी 2020 मध्ये तळणीशिवारात मथुराबाई पांडुरंग कोरडे (वय 65 वर्ष) ही वृद्ध महिला शेळीचे पिल्ले चालण्यासाठी भर दुपारी तळणी शिवारात शेतात गेली असता अज्ञात आरोपीने त्यांचा गळा दाबून खून करून अंगावरील दाग – दागिने काढून घेतल्या बद्दल नरसी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अनेक परिश्रम करूनही सदरचा गुन्हा उघड होत नव्हता.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुन्हा उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील व नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांना सूचना दिल्या.
गोपनीय सूत्राद्वारे पोलिसांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा अशाच प्रकारचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामी नागोराव सुखदेव श्रीरामे (वय 26 वर्ष रा. हानकदरी तालुका सेनगाव) याने केला आहे, अशी माहिती मिळाली.
यावरून पोलीस पथकाने संशयित आरोपी नागोराव श्रीरामे यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केले असता सदर आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल करून गुन्ह्यातील मयत महिलेच्या अंगावरील दाग- दागिने चांदीचे दंडकडे व चांदीचे काकणे एकूण 56 तोळे वजनाचे (किंमत अंदाजे 48 हजार रुपये)चा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. आरोपी हा पोलीस कस्टडीत आहे.
आरोपीने सदरचा गुन्हा केल्यानंतर इतर तीन महिलांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दाग दागिने जवरीने चोरल्याबाबत गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीवर जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलीस अंमलदार गोविंद गुट्टे, पांडुरंग डवले, हेमंत दराडे, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली.