वेध
आज या देशात सर्वांना मिळणारे शिक्षण सारखेच मिळत नाही. श्रीमंतांच्या शाळांमध्ये सर्वसुविधा मात्र शासकीय शाळांची स्थिती पाहावत नाही. कुठे वर्ग नाही, तर कुठे शिक्षक नाहीत. मोठी स्वप्न पाहण्याचा अधिकार फक्त श्रीमंतांनाच आहे का ?
आज परीक्षा चित्रपट पाहिला. प्रकाश झा यांचे चित्रपट नेहमी अवस्थ करत असतात. त्यापैकी त्यांचा परीक्षा हा चित्रपट. झोपडपट्टीत राहणारा रिक्षावाला बुची आपला मुलगा बुलबुल याने इंग्रजी शाळेत शिकावे अशी इच्छा असते. मुलाला सपफीर इंग्रजी शाळेत प्रवेशही मिळते. मात्र तेथील भरमसाठ शुल्क भरण्यासाठी बुची आणि त्याची पत्नी राधिका यांची धडपड सुरु होते.बुलबल हा हुशार असतो.
मातृभाषेतून शिकल्यामुळे इंग्रजी सोडून सर्व विषयांत त्याला गती असते. नंतर तो इंग्रजीही शिकतो.शाळेचा खर्च भागविण्यासाठी बुची चोऱ्या करु लागतो. यात तो पकडला जातो. मुलाला गरिबीच्या नरकातून बाहेर काढायचे असेल तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेशिवाय पर्याय नाही. त्याला चांगल्या संधी तेथेच मिळणार आहे.बुलबुलने फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यावे, अशी बुचीची इच्छा असते.
मात्र श्रीमंंतांच्या मुलांसाठी इंग्रजी शाळा असतात. ती आंबेडकरनगर सारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी नसते, असा एकंदरीत सूर श्रीमंत वर्गाचा असतो. भले झोपडपट्टीत राहणारा मुलगा हुशार असला तरी त्याला संधी नकोच. त्याने डाॅक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहुच नये. बुलबुल त्याच्या वर्गमित्रांना प्रश्न करतो, की स्वप्न तुम्हीच पाहावे की आम्ही नाही.
वरिष्ठ पोलिस अधिकारी आंबेडकर नगरातील मुलांना शिकवायला जातो. बुलबुल परीक्षेत चमकतो. शाळेतील इतर विद्यार्थ्यांचे पालक पोलिस अधिकाऱ्याला आमच्याही मुलांना शिकवण्याची विनंती करतात. पण ती विनंती नाकारली जाते.आमदार महोदय पोलिस अधिकाऱ्याची बदली करण्याची विनंती मंत्र्यांना करतात आणि त्याप्रमाणे ती होते.गोरगरिबांसाठी काम करणारे अधिकारी शासनकर्त्यांना नको हवी आहेत.हा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो.
आज या देशात सर्वांना मिळणारे शिक्षण सारखेच मिळत नाही. श्रीमंतांच्या शाळांमध्ये सर्वसुविधा मात्र शासकीय शाळांची स्थिती पाहावत नाही. कुठे वर्ग नाही, तर कुठे शिक्षक नाहीत. मोठी स्वप्न पाहण्याचा अधिकार फक्त श्रीमंतांनाच आहे का?
(सदरील लेख संभाजीनगर येथील प्रख्यात पत्रकार गणेश पिटेकर यांच्या ब्लॉगस्पॉट वरून घेण्यात आला आहे.)