मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तालुक्यातील बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील दिग्रसवाणी ते सिरसम मार्गावरून अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारे वाहन हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. या प्रकरणी तिघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमसह भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील कत्तलीसाठी नेणाऱ्या गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठूबोने यांच्या तपास पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील दिग्रसवाणी ते सिरसम मार्गावर एका चार चाकी वाहनात कत्तलीसाठी गोवंशाची जनावरे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सिरसम येथे पोहोचून संशयित वाहन क्रमांक एमएच 38 डी 346 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये चार गाई, दोन कारवड व एक म्हैस दाटीवाटीने त्यांना इजा होईल असे कोंबून निर्दयतेने भरून त्यांना वेदना होतील अशा स्थितीत अवैध कत्तलीसाठी घेऊन जात असताना व सदर जनावरांचा कुठलाही दाखला व वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीर रित्या वाहतूक करीत असताना मिळून आले.
याप्रकरणी इसम नामे मोसिन मोईन पठाण (वय 32 वर्षे), हसन कुरेशी दोघे (रा. जवळा बाजार ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली) व हरून या तिघा विरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुरनं 157 / 2023 कलम 11 (1) (ड) (इ) प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा 1960 सह कलम 5 (अ), 5 (ब), 9,11, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995, सह कलम 34 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, प्रेम चव्हाण, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या पथकाने केली