मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरातील गाडीपुरा येथे राहणारा व सतत गुन्हे करणारा 23 वर्षीय तरुणास एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोलीचा पदभार घेतल्यापासून एमपीडीए ऍक्ट प्रमाणे ही 29 कार्यवाही करण्यात आलेली आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली चा पदभार स्वीकारतात जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व सकट गुन्हे करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची इत्यंभूत माहिती काढून ते करत असलेल्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता व एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.
हिंगोली शहरातील गाडीपुरा येथील करण अशोक मुदीराज (वय 23 वर्षे रा. गाडीपुरा हिंगोली) याच्यावर मागील अनेक वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्धचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा 56 प्रमाणे कार्यवाही करू नये तो सतत गुन्हे करत होता. तो समाजासाठी धोकादायक बनला होता.
त्याच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिकात भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तो गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे करत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक व्यक्ती बनला होता.
म्हणून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सदर प्रकरण हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पदभार उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर अर्चना पाटील यांच्या मार्फतीने नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार,
धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य, कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, (व्हिडिओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 (एमपीडीए) चे कलम 3 (1) अन्वय कार्यवाहीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता. पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करून नमूद धोकादायक व्यक्ती करण अशोक मुदीराज (वय 23 वर्षे, रा. गाडीपुरा हिंगोली) हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरून धोकादायक व्यक्ती बनल्याने त्यास एमपीडीए 1981 (सुधारणा 1996, 2009 आणि 2015) कलम 3 (2) अन्वय एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत.
नमूद स्थानबद्ध व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून त्यास परभणी मध्यवर्ती कारागृह परभणी येथे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.