मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संतोष अवचार
हिंगोली – हुंडा पध्दती निर्मूलनासाठी हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 ची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच या कायद्याची तळागाळातील जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी समाज माध्यमाद्वारे, इलेक्ट्रानिक मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. हुंडा पध्दती निर्मूलनासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नियमितपणे हुंडा बंदीची शपथ घेण्याचा उपक्रम राबवावा. या विद्यार्थ्याच्या माध्यमातून हुंडा बंदी कायद्याची माहिती घराघरामध्ये पोहोचवण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसमावेश महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र एडके, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, जिल्हा संरक्षण अधिकारी माया सुर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, शुभमंगल सामुहिक विवाह योजना ही गोरगरीब, कष्टकरी अनेक कुटुंबांना सहाय्य करणारी महत्वाची योजना असून या योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावेत. तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी ही प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात यावेत. यासाठी जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, मानव विकास यासह महिला बचत गटांना अर्थसहाय्य देणे, संजय गांधी योजना या विविध योजनेचा आढावा घेतला.