मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दामिनी पथक नियुक्त करून या पथकास योग्य ते मार्गदर्शन केले आहे. सदरील दामिनी पथकाने 12 ते 18 डिसेंबर यादरम्यान चार इसमावर 110 / 117 मुपोका प्रमाणे कार्यवाही करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने 12 ते 18 डिसेंबर या दरम्यान शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, मुलींचे वस्तीगृह, रेल्वे स्थानक, बस स्थानक व इतर ठिकाणी एकूण 30 वेळा भेटी दिल्या.
दरम्यान 110 / 117 मुपोका प्रमाणे 4 इसमावर कार्यवाही करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दामिनी पथकाने 12 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाला कन्या, जिल्हा परिषद प्रशाळा बहुविध, जिल्हा परिषद प्रशाला उर्दू, जिल्हा परिषद प्रशाला येहळेगाव सोळंके, 14 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा गोरेगाव, जिल्हा परिषद प्रशाला केंद्रा व जिल्हा परिषद प्रशाला आजगाव येथे भेटी देऊन स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम राबवण्यात आला. उर्वरित शाळा नियोजित आहेत.
या कार्यक्रमादरम्यान इयत्ता 8 वी ते 9 वीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमाबाबत व संकट काळातील सोबती डायल 112 तसेच गुन्हे प्रतिबंध व बालविवाह प्रतिबंध, महिला व मुलांची सुरक्षा तसेच दामिनी पथक ऑनलाइन फसवणूक कायद्यासंदर्भात माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय येथील कार्यालयीन कामकाज याबाबत माहिती दिली.
तसेच कवायत वाहतुकीचे नियम याबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यक्रमादरम्यान सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक हजर होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे, पोलीस नायक शिवाजी पारस्कर वाहतूक शाखा हिंगोली, महाराष्ट्र पोलीस शिपाई आरती साळवे, अर्चना नखाते, सलमा शेख हे उपस्थित राहून कार्यक्रम घेण्यात आला.