मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील दहशतवाद विरोधी शाखेने अवैधरित्या व दहशत माजवण्याच्या उद्देशाने हत्यार बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 अन्वयम गुन्हा दाखल केला आहे. या पथकाने दोन दिवसात ही कारवाई केली.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार 3 फेब्रुवारी रोजी दहशतवाद विरोधी शाखेचे पथक अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री व अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कार्यवाहीसाठी हिंगोली शहर व परिसरात पेट्रोलिंग करत असताना पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने हिंगोली शहरालगत ससेवाडी परिसरात इसम नामे रफी महमद गुलाम (वय 40 वर्ष) याला अवैधरित्या व दहशत वाजवण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ लोखंडी कोयता (14 इंच लांबीचे) बाळगून असताना ताब्यात घेण्यात आले.
सदरील व्यक्तीविरुद्ध पोलीस अंमलदार धनंजय पुजारी यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच 2 फेब्रुवारी रोजी दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने हिंगोली शहरातील मोची गल्ली मध्ये नामे राम रमेश कुरील (वय 20 वर्ष) यास अवैधरित्या व दहशत माजवण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ त्याने बाळगून असलेला धारदार लोखंडी कोयता (अंदाजे 29 इंच) जप्त करून नमूद व्यक्तीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, धनंजय पुजारी, दिलीप बांगर, शेख शफियोयुद्दीन, शेख रहीम सर्व दहशतवाद विरोधी शाखा हिंगोली यांनी केली.