मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिकास आलेल्या दाटेगाव येथे जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहेत. गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. गावातील महिलांना व बालकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा आदर्श कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायतचा दर्जा मिळालेल्या दाटेगाव येथील ग्रामस्थांना पावसाळा संपून काही दिवस उलटत नाहीत तोच हिवाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे गावात जलजीवन मिशन टप्पा दोन अंतर्गत नळ जोडणी सह सर्व कामे झालेली असून काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांनी सदरील योजनेची पाहणी केल्याचे समजते.
मात्र असे असताना आदर्श ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात नावलौकिकास आलेल्या या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांना हिंगोली नगर परिषदेच्या दिग्रस कराळे येथील जल कुंभातून पाणीपुरवठा होतोय. सदरील पाणीपुरवठ्याची पाईप लाईन जुनी झाल्याने अनेक वेळा फुटत आहे.
पाईपलाईनला एका दुरुस्तीसाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो असे येथील ग्रामसेवक उत्तम आडे यांनी सांगितले. मात्र गावात जलजीवन मिशन टप्पा दोन अंतर्गत काम झालेले असताना दिग्रस कराळे येथील नगर परिषदेच्या जल कुंभातून दाटेगाव ग्रामपंचायत पाणी हवे कशाला असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.
एकंदरीत ग्रामस्थांनी पाणीपट्टी न भरल्याच्या कारणावरून येथील पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. आदर्श ग्रामपंचायत म्हणून घेणाऱ्या दाटेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामस्थ पाणीपट्टी भरत नसतील तर जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायत यांनी या ग्रामपंचायतीचा आदर्श कसा घ्यावा. तसेच दाटेगाव ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणावे तरी कसे असाही प्रश्न पडू लागला आहे.
… त्यामुळे गावचा पाणीपुरवठा बंद – ग्रामसेवक आडे
मपंचायत असलेल्या दाटेगावात दिग्रस कराळे येथील नगर परिषदेच्या वाटर फिल्टर मधून जुन्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ही पाईपलाईन अनेक वेळा उठत राहते पाईपलाईनला दुरुस्तीसाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येत असतो गावातून वसुली नाही आणि पाईप लाईनला येणारा भरमसाठ खर्च या दोन्हींमध्ये ग्रामपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगर परिषदेची 22 लाख रुपयाची पाणीपट्टी रक्कम देणे आहे. ग्रामस्थ नोटीस दवंडी घरोघरी मागणी करूनही पाणीपट्टी जमा करत नाहीयेत. त्यामुळे गावातील पाणी बंद करण्यात आलेले आहे, असे आदर्श ग्रामपंचायती गावचे ग्रामसेवक उत्तम आडे यांनी व्हाट्सअप या सोशल माध्यमातून ‘मार्मिक महाराष्ट्र’ प्रतिनिधीकडे कळविले आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनाही खबर नाही…
हिंगोली जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून नाव लोकिकास आलेल्या दाटेगाव येथील ग्रामस्थांना हिवाळ्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याची गंभीर बाब हिंगोली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना माहीतच नसल्याचे दिसते दाटे गावचा जलजीवन मिशन अभियानांतर्गत समावेश असून येथील ग्रामस्थांना पाणी का मिळत नाही याची माहिती आपण ग्रामसेवकाकडून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करू असे हिंगोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी भ्रमणध्वनी वरून मार्मिक महाराष्ट्र प्रतिनिधी सांगितले.