गणेश पिटेकर / पुणे :-
शाळेत आणि महाविद्यालयात इतिहास हा विषय शिकत असताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीजींच्या योगदानाविषयी वाचले होते. त्यानंतरही त्यांच्याबद्दल वाचत आलो आहे. परदेशात भारताला गांधींचा देश म्हणून ओळखले जाते. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात गैरसमजूती तयार केल्या गेल्या आहेत. मग ती भारताची फाळणी, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुणे करार यासह अनेक.
म्हणतात महात्मा गांधी म्हणजे भारताला पडलेल सुंदर स्वप्न आहे.प्रत्येक वर्षी त्यांच्यावर जगभरात ग्रंथ प्रकाशित होत असतात. उजव्या विचाराच्या लोकांनी कितीही गांधींना नाकारण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचे महत्त्व कमी होत नाही. सत्तेच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांनी अहिंसा आंदोलन, सत्याग्रह आणि उपोषण यांसारखी साधने भारतीयांना दिली. आज या साधनांचा सर्वसामान्य माणूस अन्यायाविरोधात शस्त्र म्हणून वापरताना दिसतो.
नुकतेच चंद्रकांत वानखडे यांचे गांधी का मरत नाही? हे पुस्तक वाचलं. त्यात महात्मा गांधींविषयी देशभरात जे गैरसमज पसरवले गेले, ते दूर करण्याचे काम केले गेले आहे. सदरील पुस्तक वाचून आपण काही तरी मिळवले असे वाटत आहे. भारत स्वातंत्र झाला आणि निवडणुकीनंतर पहिले मंत्रिमंडळ बनवले जाणार होते. पंडित नेहरु मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी घेऊन गांधींकडे जातात. ती यादी पाहून ते नेहरुंना म्हणतात ही तर सर्व तुमची माणसं. या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश करा. गांधींच्या आग्रहातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर देशाचे पहिले कायदेमंत्री होतात. हे सर्व आठवण्यामागील कारण म्हणजे नुकतेच आगा खान पॅलेसला भेट दिली.
या महालात महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी येथे काही महिने राहायला होते. येथे कस्तुरबा गांधी यांची समाधी आहे. सरोजिनी नायडू, महादेव देसाई यासारख्या अनेक दिग्गज व्यक्तिंना येथे कैद करुन ठेवले होते. माझं गाव नेवासा. येथून पुण्याला येताना नेहमी आगा खान पॅलेस एसटी बसमधून दिसत असतं. मग छत्रपति संभाजीनगरहून (पूर्वीचे औरंगाबाद) पुण्याला येताना असेच व्हायचे. आता तर पुण्यात कामानिमित्त राहतो. खूप दिवसांची इच्छा होती, की आपण कधीतरी या महालात जाऊन यायचे. कारण येथे महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी काही काळासाठी राहिले होते. ती इच्छा नुकतीच पूर्ण झाली.
महालात वस्तुसंग्रहालय आहे. येथे महात्मा गांधींचा पुतळा आहे. वाटत की गांधी आपल्याला बसून पाहात आहेत. पुतळा जिवंत वाटतो. या संग्रहालयात कस्तुरबा गांधींचा फोटो आणि डिजिटल स्क्रिनवर त्यांच्याविषयी माहिती सांगितले जाते. ग्रंथालय पण या ठिकाणी आहे. महाल पाहण्यासाठी शाळकरी मुले, नागरिक ये-जा करताना दिसले. हा तर फारच सुखद अनुभव होता. या महान नेत्याने परदेशात मोठी संधी असतानाही देशसेवेसाठी मोठं काम करुन ठेवले आहे. नामदार गोखले हे त्यांचे गुरु. त्यांनी महात्मा गांधींना पूर्ण भारत फिरायला सांगितले, ते फिरले पण. हे सर्व आठवलं, त्याचं कारण केवळ आगा खान पॅलेसची भेट हेच होय.