मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी हिंगोली पोलिसांकडून पोलीस दीदी व पोलीस काका हा उपक्रम पुन्हा एकदा राबविला जात आहे. याआधीही हा उपक्रम राबविण्यात आला होता, मात्र कालांतराने तो बंद पडला होता. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 450 शाळा व महाविद्यालयात तक्रारपेटी बसविण्यात आली आहे.
हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊन समाजात शांतता नांदावी, विशेषता महिला व मुलींना सुरक्षेबाबत तसेच त्यांच्यावर होणारे अन्याय – अत्याचार थांबावे व अशा घटनांना आळा बसावा पोलीस हे त्यांचे रक्षक व मित्र आहेत ही भावना त्यांच्यात वाढावी म्हणून जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व महाविद्यालय या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून पोलीस दीदी / पोलीस काका हा उपक्रम राबविला जाणार आहे.
सदर उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक माध्यमिक शाळा व महाविद्यालय या ठिकाणी पोलिसांकडून तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे.
तसेच सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस दीदी पोलीस काकामध्ये काम करणारे अधिकारी व अंमलदार यांचे पथक निर्माण करण्यात आले आहे. पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या शाळा महाविद्यालय या ठिकाणी 100 टक्के तक्रार पेटी बसविणे व सदरची तक्रारपेटी दर पंधरा दिवसांनी या पथकाने जाऊन स्वतःची तक्रारपेटी उघडून त्यात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.
यानुसार हिंगोली जिल्ह्यातील 13 पोलीस ठाणे अंतर्गत एकूण 450 माध्यमिक शाळा महाविद्यालय या ठिकाणी तक्रारपेटी बसविण्यात आलेली आहे.
पोलीस दीदी व पोलीस काका या उपक्रमांतर्गत संबंधित पथकातील अधिकारी व अंमलदार हे वेळोवेळी त्यांच्या हद्दीतील प्रत्येक शाळा व महाविद्यालय या ठिकाणी जाऊन तेथील विद्यार्थिनी व महिला कर्मचारी यांना भेटून त्यांच्या अडीअडचणी तसेच लैंगिक अत्याचाराबाबत व त्यांची सुरक्षा संबंधाने माहिती घेऊन त्यांना महिलांबाबत असलेले नियम व कायदे तसेच त्यांचे अधिकार याविषयी हेल्पलाइन क्रमांक डायल 112, दामिनी पथक, भरोसा सेल यांची मदत याबाबत सविस्तर मार्गदर्शनही केले जाणार आहे.
अशा शाळा व महाविद्यालय या ठिकाणी काम करणारे व शिक्षण घेणाऱ्या महिला व मुलींना काहीही तक्रार, त्रास असल्यास त्यांनी आपले शाळा व महाविद्यालयात पोलीस दीदी / पोलीस काका या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या तक्रार पेटीत तक्रार टाकावी.
सदरच्या तक्रारीबाबत पूर्णपणे गोपनीयता बाळगण्यात येईल. माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील मुली व महिला कर्मचारी यांच्यात मैत्रीपूर्ण विश्वासाचे संबंध प्रस्थापित करण्याचा एक चांगला प्रयत्न सुरू आहे. सदर योजनेस चांगल्या प्रकारे हिंगोली जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयातून प्रतिसाद मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी असाच प्रकारचा उपक्रम हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात आला होता, मात्र कालांतराने तो बंद पडला. हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पुन्हा एकदा पोलीस दीदी व पोलीस काका उपक्रम महिला व मुलींचा सुरक्षेसाठी सुरू केला असून तो अखंडितपणे सुरू राहावा हीच अपेक्षा.