हिंगोली संतोष अवचार
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिनाचे औचित्य साधून आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘मियावाकी’ पध्दतीने 12 हजार वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीमुळे परिसरातील नागरिकांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचे सुशोभिकरण व्हावे. यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.
एक जुलै रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिंगोली नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते ‘मियावाकी’ पध्दतीने घनवन वृक्ष लागवड करुन करण्यात आला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीची चळवळ ही संपूर्ण जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे.
या वृक्ष लागवड कार्यक्रमास प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच येथील नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.