मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी.एस. मिरदुडे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व इतर विभागाचे सदस्य तसेच सेवाभावी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम यांनी एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाचा आढावा सादर केला. एप्रिल ते जून 2022 या कालावधीमधील जिल्ह्याने सामान्य गटातील 99 टक्के व गरोदर महिलांची 122 टक्के एचआयव्ही चाचणीचे उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्ह्याचा एचआयव्ही पॉझिटिव्हीटी ट्रेंड कमी झाल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी अभिनंदन केले. एप्रिल ते जून, 2022 या कालावधीमध्ये एकूण 40 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्या 40 रुग्णांची एआरटी औषधोपचारासाठी एआरटी केंद्रामध्ये नोंदणी करण्यात आली आहे.
तसेच एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या मागील 18 महिन्यापासूनच्या एकूण 17 बालकांना मातेकडून बालकास होणाऱ्या एचआयव्ही संसर्गापासून योग्य समुपदेशन व उपचारामुळे एचआयव्ही मुक्त ठेवण्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत यशस्वी काम करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अति जोखीम लोकसंख्या असलेल्या 37 गावांमध्ये एप्रिल ते जून 2022 या कालावधीमध्ये एचआयव्ही/एड्स माहिती, शिक्षण, संवाद आणि चाचणी अभियान राबविण्यात आले आहे.या बैठकीस उपस्थित असलेल्या अध्यक्षासह सर्व सदस्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले.