मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्हा परिषदेचे माजी अपक्ष सदस्य अजित मगर हे वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची नुसती चर्चा होती; मात्र अजित मगर यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करू शकतो असे सूचक त्यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस वरून दिले आहे.
हिंगोली येथील जिल्हा परिषदेचे माजी अपक्ष सदस्य अजित मगर यांनी गत विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून कळमनुरी मतदार संघात निवडणूक लढविली होती. पहिल्या तीन ते चार उमेदवारात त्यांची गणना झाली होती. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना मोठे आव्हान दिले होते.
मात्र ते ही निवडणूक जिंकू शकले नाहीत शिवसेनेचे प्रबळ आणि विद्यमान आमदार संतोष (दादा) बांगर हे या विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले.
त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अपक्ष सदस्य अजित मगर हे भाजपात जाणार असल्याच्या नुसत्या वावड्या उठल्या होत्या. त्यांनी भाजपाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष रामराव वडकुते यांची भेट घेतल्याच्याही चर्चा झाल्या; मात्र त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही.
आता ते शिवसेनेत जाणार असल्याचे त्यांनी स्वतःच आपल्या व्हाट्सअप स्टेटस वरून जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी प्रसार माध्यमातील प्रतिनिधींना म्हटले आहे की, सोमवारी पक्षश्रेष्ठींच्या सोबत चर्चेअंती माझा अधिकृत प्रवेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊ शकते, असे सूचक भाष्य केले आहे.
त्यांच्या या भाषावरून ते शिवधनुष्य उचलणार असल्याचे जाहीर झाले आहे. तसेच ते शिवसेनेकडून कळमनुरी विधानसभेसाठी प्रबळ उमेदवार असण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची येणारी निवडणूक ही अतिशय चुरशीशी होणार असल्याचे दिसते.