मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क /विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – अक्षय तृतीया हा तसा सोने – नाणे तसेच जंगम आणि स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. अक्षय तृतीयेस भारतीय हिंदू समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे, मात्र सदरील दिवस एका घटनेने काळवंडलेला किंवा आपण त्याला शापित म्हणून असा आहे तो म्हणजे बालविवाह..
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवसास अनन्यसाधारण असे महत्त्व भारतीय हिंदू समाजात आहे. यंदा हा दिवस 10 मे रोजी साजरा केला जाणार असून या दिवशी सोने – नान्यासह चैनीच्या वस्तू आणि स्थावर तसेच जंगम मालमत्तांची लयलूट केली जाते. दिवस शुभ मानला जात असल्याने मोठ्या प्रमाणात या दिवशी आर्थिक उलाढाल होते. जमीन खरेदी-विक्रीच्याही मोठ्या प्रमाणात नोंदी होतात. गृहप्रवेश वास्तु आदीही मोठ्या प्रमाणात होतात.
या दिवसास अनन्यसाधारण असे महत्त्व भारतीय हिंदू समाजात आहे, मात्र या सर्व धामधुमीत या दिवशी आणखी एक घटना घडते जी घडायला नको आहे ती म्हणजे बालविवाह. बालविवाह हा देशास लागलेला अभिशाप आहे! आपल्या पाल्यास सज्ञान होऊ न देताच त्यांचा विवाह लावून आपल्या पालकत्वातून मुक्त होऊ पाहत असतात.
अशा बालविवाहातून पुढे अनेक सामाजिक आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या घटनांमध्ये सर्वाधिक बळी पडतात त्या मुली. आदिवासी भागांसह खेडेगावात ज्यांच्याकडे चांगली शेती आहे आणि पैसाही रगड आहे, अशा कुटुंबात बालविवाहाच्या घटना घडतात.
बालविवाहाची पाळेमुळे एवढी खोलवर रुजली आहेत की, अनेक समाज यातून बाहेर पडण्यास अजूनही तयार नाही. असे बालविवाह होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून दरवर्षी वर्षभर तसेच साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशीही विशेष खबरदारी घेतली गेली आहे.
हिंगोली जिल्हाधिकारी यांनी या दिवशी होणारे बालविवाह थांबवावेत, असे आवाहन केले आहे. हा दिवस शुभ दिवस म्हणून मानला जातो. त्यामुळे त्याचे पावित्र्य जपायला हवे. तसे प्रत्येक दिवसाचेच (बालविवाह घडू नयेत) पावित्र्य जपायला हवे. त्यासाठी शिक्षण हे अतिमहत्त्वाचेच सोबत शासकीय नोकरी किंवा रोजगार असेल तर सोन्याहून पिवळेच!
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. तसेच त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2022 देखील लागू करण्यात आलेला आहे. या नियमानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी भागासाठी तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका व शहरी भागासाठी पर्यवेक्षिका यांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह होऊ शकतात. यास प्रतिबंध म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतात. त्यानुसार एखाद्या पुरुषाने अल्पवयीन बाल वधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
बालविवाह झाल्यास संबंधित वर व वधु यांचे आई-वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार, विवाह विधी पार पाडणारे संबंधित व्यक्ती, फोटोग्राफर, प्रिंटींग प्रेस, वाजंत्री, सभागृह व्यवस्थापक, कॅटरिंग अशा बालविवाह घडविण्यास मदत करणाऱ्या सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.
तसेच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांनी जन्म दाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत म्हणून आम्ही मागील कित्येक वर्षांपासून सतर्क राहून काम करत आहोत. बालविवाहाच्या अनेक घटना आम्ही थांबविल्या आहेत. एप्रिल महिन्यात 7 ते 8 बालविवाह रोखण्यात यश आले आहे तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांची माहिती आधीच मिळाल्याने हे सर्व बालविवाह रोखण्यात आम्हाला यश आले आहे. यंदा विशेष खबरदारी घेण्यात आली असून प्रशासनाकडून बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नेमले गेलेले आहेत. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या बालविवाह वर पूर्णतः अंकुश मिळवता येईल.
राजाभाऊ मगर (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली)