मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – भारतीय स्वातंत्र्या चा देशभरात अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. याचे औचित्य साधून हिंगोली येथे 15 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फूल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने येथील नगर परिषदेच्या शिवाजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात दि. 15 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा हिंगोली जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
75 कि.मी. तिरंगा सायकल राईडचे आयोजन
जिल्हा प्रशासन हिंगोलीतर्फे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडून 75 कि.मी. तिरंगा सायकल राईडचे आयोजन करण्यात आले आहे.ही सायकल राईड दि. 14 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता येथील पोलीस कवायत मैदान येथून निघणार असून ती हिंगोली-नर्सी ना.-सेनगाव-कोळसा या मार्गाने जाऊन याच मार्गाने परत येणार आहे.
या सायकल राईडमध्ये 175 सायकल पटू हिंगोली व इतर विविध जिल्ह्यातून सहभागी होणार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.