हिंगोली : संतोष अवचार
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, देशाप्रती भक्तीसह कृतज्ञतेची जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने 11 ते 17 ऑगस्ट हे सात दिवस संपूर्ण जिल्हाभर “हर घर झेंडा” हा विशेष उपक्रम राबविला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झेंडा” या विशेष उपक्रमासह भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीणकुमार धरमकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, क्रांती डोंबे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल राठोड व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने “हर घर झेंडा” या उपक्रमाच्या आयोजनाबाबत विविध निर्देश दिलेले आहेत. यानुसार संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक नागरिकांचा सहभाग घेऊन अधिकाधिक लोकसहभागातून हा उपक्रम राबवावा. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालय, परिवहन, आरोग्य केंद्र, रास्तभाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा यात महत्वाचा सहभाग घेऊन हा उपक्रम राबवावा, अशा सूचनाही श्री. पापळकर यांनी दिल्या.
भारतीय ध्वज संहिता 2002 भाग 1 मधील परिच्छद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर, सूत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असेल, असे नमूद केले होते. या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क, खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार आता तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल, असे केंद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
हा अभिनव उपक्रम संपूर्ण जिल्हाभर यशस्वी व्हावा व प्रत्येक इच्छूक नागरिकांचा सहभाग यात नोंदविला जावा यादृष्टीने लवकरच स्वतंत्र ॲप विकसित करुन त्यात प्रत्येकाला आपले नाव नोंदविता येईल. याचबरोबर या उपक्रमात भाग घेणाऱ्या प्रत्येकांना याचे छायाचित्रण, चित्रफित, ध्वनीमुद्रण आदी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करता येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
तसेच भारतीय स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत आहे. हा उपक्रम जनतेच्या मनात स्वांतत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हुतात्मा स्मारकाचे सुशोभिकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा, जिल्ह्याच्या ठिकाणी तिरंगा बलून सोडणे, रस्ते संग्रहालय, ऐतिहासिक ठिकाणाची माहिती तयार करणे, स्वातंत्र्य दिनी प्रभात फेरीचे आयोजन करणे, विविध स्पर्धा आयोजित करणे, सांस्कृतिक कार्यक्रम, अमृत महोत्सवाचा लोगो शासकीय इमारतीवर लावणे, कार्यालयाची स्वच्छता आदी विविध उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या.
या दोन्ही उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि प्रत्येक ग्रामपंचायती यांचा महत्वपूर्ण सहभाग राहील. यासाठी ग्रामपंचायतीचा कृती आराखडा, जिल्ह्यातील सर्व आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभागीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, रास्तभाव दुकान, शाळा-महाविद्यालय, पोलीस, परिवहन सुविधा, मनपा, नगरपरिषद, नगरपंचायत या सर्व विभागाशी सुवर्णमध्य साधून अधिक लोकसहभागावर भर देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत दिले.