मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात दिपावली-2022 संबंधाने तात्पुरते फटाके परवाना (मोकळ्या जागेत) मिळण्यासाठी दिनांक 21 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत किरकोळ फटाके विक्रीचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांना तात्पुरते फटाके परवाना मिळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांच्याकडे अर्ज करावेत. हा अर्ज स्फोटक अधिनियम 2008 मधील नियम 113 (फॉर्म नं. एई-5) मध्ये करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत अर्जदाराच्या पासपोर्ट साईज आकाराची तीन फोटो व संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, तहसीलदार, पोलीस स्टेशन यांचे नाहरकत प्रमाणपत्र व अर्जदारांचे चारित्र्य प्रमाणपत्र, जागेच्या मालकीचा पुरावा व मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील.
खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून तात्पुरते फटाके परवान्यासाठी दि. 12 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. त्याशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
तात्पुरते फटाके ज्वलनशील नसलेल्या शेडमध्ये ठेवण्यात यावे व त्यामध्ये अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था ठेवावी, फटाके विक्रीचे व साठवणुकीचे दुकाने एकमेकांपासून कमीत कमी तीन मीटर अंतरावर असावेत आणि सुरक्षित कामापासून 50 मीटर अंतरावर असावे, फटाके शेड हे एकमेकाच्या समोर नसावे, कोणत्याही प्रकारचे तेलाचे दिवे, गॅस दिवे, उघडे दिवे शेडमध्ये सुरक्षित अंतरामध्ये वापरु नये व विद्युत बल्ब वापरल्यास ते भिंतीला लावलेले असावेत.
केवळ वायरने लोंबकाळत ठेवण्यात येऊ नये. विद्युत बल्बचे बटन प्रत्येक दुकानाच्या भिंतीवर लावलेले असावेत व मास्टर स्विच प्रत्येक रांगेमध्ये असावे. कोणत्याही प्रकारचे फटाके शेड पासून 50 मीटर आत फोडू नये. एका ठिकाणी 50 पेक्षा अधिक दुकांनाना परवानगी देण्यात येणार नाही.
व्यवसाय कर अधिकारी यांचे ना-देय प्रमाणपत्राशिवाय अर्ज स्विकारला जाणार नाही. तात्पुरता फटाका परवान्याची पाचशे रुपये फीस चलनाद्वारे भरणा करणे आवश्यक राहील, असे जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.