मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – शहरातील ऑटोचालक व इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना खाकी गणवेश परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य बाजारपेठेतील दुकान मालकांनी त्यांच्या दुकाना समोर रोडवर लावलेले बॅनर्स काढून घ्यावेत अन्यथा प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा शहर वाहतूक पोलीस शाखा पोलीस निरीक्षक यांनी दिला आहे.
हिंगोली शहरात 13 ते 20 ऑगस्ट पर्यंत वाहतूक शाखे मार्फत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकाविरुद्ध प्रभावी कार्यवाही करत वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध 76 केसेस करून एक लाख सहा हजार रुपयांचा दंड, तसेच ट्रिपल सीटच्या 308 केसेस करून तीन लाख आठ हजार रुपयांचा दंड, इतर कलमान्वये 376 केसेस करून दोन लाख 44 हजार 250 रुपयांचा दंड, असे एकूण 760 वाहनांवर 6 लाख 58 हजार 250 रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.
तसेच वाहन चालक, फळ विक्रेते व रोडवर गाडा लावून दुकानदारी करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येत आहे. ऑटो व इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना गणवेश परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे.
हिंगोली शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकान मालक यांनी त्यांच्या दुकानासमोर रोडवर लावलेले पोस्टर, बोर्ड काढून घेण्यात यावे अन्यथा त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
तसेच रोडवरील हातगाडे, फेरीवाले यांनी त्यांच्या ताब्यातील गाडे रोडवर उभे केल्यास तसेच तीनचाकी, चार चाकी व इतर वाहने रस्त्याच्या मधोमध उभे आढळून आल्यास भादंवि कलम 283 प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
सर्व व्यापारी, दुकान मालक यांनी शहरातील मुख्य चौकातील रस्त्यावर त्यांच्या दुकानाच्या समोर रोडच्या मधोमध लावलेले बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी काढून टाकावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
बुलेट वाहन व इतर रेसरबाईकचे सायलेन्सर मध्ये बदल, कर्णकरकश हॉर्न व इतर केलेला बदल काढून टाकावा अन्यथा वाहन डिटेन करून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल.
त्याचप्रमाणे ज्या वाहनांवर मोटार कायद्याचे उल्लंघन केल्याने बंद करण्यात आला आहे अशा वाहन चालकांनी दंड झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत रीतसर दंड भरून दंड भरण्याची पावती घेणे अन्यथा मुदत संपल्यानंतर त्यांचे वाहन डिटेन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही हिंगोली चे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा हिंगोली पोलीस निरीक्षक एस. एस. आम्ले व वाहतूक शाखेचे सर्व पोलिस अंमलदार यांनी केली.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन
मोटार वाहन कायद्याचे पालन करावे, तसेच हिंगोली शहरात नो पार्किंग झोन मध्ये वाहन उभे करू नये, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, असे आवाहन करत जे वाहन चालक मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.