मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – आजादी का अमृत महोत्सवा अंतर्गत “उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर ॲट 2047” हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दि. 25 ते 30 जुलै या कालावधीत राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने हिंगोली जिल्ह्यात दि.27 व 28 जुलै, 2022 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या आठ वर्षात हिंगोली जिल्ह्यातील महावितरणच्या वतीने विविध योजनांतर्गत झालेल्या विद्युतीकरणांच्या कामांची चित्रफित, पथनाट्य, कलापथक तसेच लाभधारकांची मनोगते अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 जुलै रोजी कळमनुरी येथे तोष्णीवाल मंगल कार्यालयामध्ये दुपारी दोन वाजता तर दि. 28 जुलै रोजी हिंगोली शहरात वीज कर्मचारी पतसंस्था कार्यालय, नारायण नगर येथे दुपारी दोन वाजता जिल्ह्यातील सन्माननीय खासदार, आमदार यांच्या प्रमूख उपस्थितीत लाभधारकांच्या साक्षीने उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर ॲट 2047 हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
राष्ट्रीय पातळीवर आयोजित या कार्यक्रमात देशातील 773 जिल्ह्यात आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांचा समावेश आहे. या महोत्सवाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन कार्यक्रम घेण्यात येणार असून या कार्यक्रमात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध विद्युत योजनाच्या माध्यमातून गावपाड्यात, शेतात ऊर्जीकरण झालेल्या लाभार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आले आहे.
राज्याचे मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी नुकतीच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांना या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना संदर्भात व्ही.सी.द्वारे मार्गदर्शन केले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर नोडल ऑफिसर म्हणून महावितरणच्या हिंगोली मंडळाच्या अधीक्षक अभियंता रजनी देशमूख यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहकार्य करण्यासाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील पीएफसीचे उपमहाव्यवस्थापक गेवेश पाकमोडे यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास सर्व लाभधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता रजनी देशमुख यांनी केले आहे.