मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – शिवसेना (शिंदे गटा)चे अधिकृत उमेदवार हेमंत पाटील यांना भाजपाने प्रचंड विरोध केल्यानंतर महायुतीकडून हेमंत पाटील यांना बदलून त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे ते उमेदवार आहेत. 4 एप्रिल रोजी कोहळीकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे समजते.
हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी आधी महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यास विलंब झाला. उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील पक्षांकडून रस्सीखेच पाहायला मिळाली त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) यांना हिंगोलीची जागा सुटली.
या जागेवर हेमंत पाटील हे उमेदवार म्हणून घोषितही करण्यात आले; मात्र भाजपने त्यांच्या उमेदवारीविरुद्ध प्रचंड विरोध केला.
दोन दिवसाच्या प्रचंड धूसफुशीनंतर 3 एप्रिल रोजी शिवसेना (शिंदे) गटाकडून हेमंत पाटील यांना बदलून त्यांच्या जागेवर बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे समजते.
बाबुराव कदम कोहळीकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील त्यांचा 4 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याचेही समजते.