मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयाच्या एआरटीएम इंग्लिश स्कूलची मान्यताही महाराष्ट्र शासनाची आहे, मात्र शाळेच्या बोर्डावर इंग्लिश स्कूल सीबीएससी करिक्युलम (अभ्यासक्रम) अशी पाटी लावलेली आहे.
बहुतांश पालकांना करिक्युलर या नावाचा अर्थ माहित नसून सीबीएससी एवढेच पाहून आपल्या पाल्यांचे प्रवेश या शाळेत घेतलेले आहेत. शाळेचे शुल्क देखील ग्रामीण भागातील पालकांना न परवडणारे असे आहेत. या सर्व प्रकरणी महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या वतीने निवेदन देऊन या शाळेवर तसेच शाळा संचालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र सेनगाव गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेची केवळ मान्यता तपासणी करून कारवाही केली नाही. त्यामुळे अनेक पालकांची लूट शाळेकडून सुरूच आहे.
सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयाने काही वर्षांपूर्वी महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थिनींना महाविद्यालय परिसरात राहण्याची सोय व्हावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निधी घेऊन वसतिगृहाची बांधणी केली, मात्र सदरील वस्तीगृहात मुलींना प्रवेश न देता या वस्तीगृहात ये आर टी एम इंग्लिश स्कूल काढून सीबीएसई करिक्युलम असा बोर्ड लावून शिक्षणाचा बाजार मांडला आहे. बहुतांश पालकांना करिक्युलम या शब्दाचा अर्थच माहीत नसून केवळ सीबीएसइ एवढेच पाहून या शाळेत आपल्या पालकांचे प्रवेश घेतले जात आहे.
शाळेचे प्रवेश शुल्क ही ग्रामीण भागाच्या दृष्टीने महागडे असून ते अनेक पालकांना झेपावत देखील नाही. असे असले तरी केवळ आपल्या पाल्याचे शिक्षण चांगले व्हावे म्हणून अनेक पालक आपल्या पोटाला चिमटा देऊन या शाळेत आपल्या पाल्याचे प्रवेश करत आहेत, मात्र त्यांची शाळा कडून फसवणूक केली जात असून शाळा सीबीएससी पॅटर्न नाही.
सदरील शाळेवर तसेच शाळा संचालकावर कारवाही करावी या मागणीसाठी महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनच्या वतीने ऑगस्ट महिन्यात गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
सदरील निवेदनाची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी यांनी केंद्रप्रमुखांना आदेशित करून शाळेची केवळ मान्यता तपासणी केली.
त्यात ही शाळा महाराष्ट्र राज्य शासनाच्या मान्यता मिळालेली असल्याचे उघड झाले, मात्र पुढे शाळेवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शाळेकडून अद्यापही सीबीएसईच्या नावाखाली ग्रामीण भागातील पालकांची लूट केली जात आहे. या सर्व प्रकाराच्या विरुद्ध महाराष्ट्र एनजीओ फेडरेशन आवाज उठवणार आहे.