मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील भरोसा सेलने दुरावा निर्माण झालेल्या 24 संसाराच्या गाठी घट्ट केल्या असून त्यांच्यात नवचैतन्य फुलले आहे. सर्व मतभेद विसरून पती-पत्नी व सर्व परिवार आनंदाने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारी तसेच अवैध धंदे यांच्या विरुद्ध कठोर भूमिका घेऊन कठोर कार्यवाही सुरू केले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय येथील विविध विभागातील प्रशासनही अधिक गतिशील व अधिक कार्यक्षम केल्या असून पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात भरोसा सेलही उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
सदर भरोसा सेलमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख इस्माईल, महिला पोलीस अंमलदार सुनीता शिंदे, स्वाती डोलार, अरुणा पेदोर, अनिता जाधव, वर्षा शिंदे, समुपदेशक दिपाली लोणकर व योगेश महाजन यांची नेमणूक करण्यात आलेले आहे.
नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच समुपदेशक यांनी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात भरोसा सेल येथील कार्यालयात महिलांच्या कौटुंबिक वादाच्या तक्रारी अर्जात माहे डिसेंबर 2022 मधील बैठकीत ठेवण्यात आलेल्या एकूण 53 कौटुंबिक तक्रारी अर्जांपैकी 24 अर्जांमध्ये ज्यामध्ये सदर अर्जातील पती व पत्नीत तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यात काही कारणास्तव मतभेद निर्माण झाले होते, त्यांच्या संसारात वाद सुरू होते अशा जोडप्यांना योग्य व समर्पक समुपदेशन करून त्यांच्या संसारात निर्माण झालेला दुरावा मिटवून त्यांच्या संसारात गोडवा आणण्यात भरोसा सेल हिंगोली यांनी केलेल्या परिश्रमाला फळ मिळाले आहे.
6 जानेवारी रोजी हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे भरोसा सेल यांच्याकडून समेट/ तडजोड घडून आणलेल्या 24 जोडप्यांचे शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या पुढील संसारीक जीवन सुखमय होण्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी प्रभारी पोलीस उपाधीक्षक (गृह) वैजनाथ मुंडे, पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ ढोले व भरोसा सेल मधील सर्व अधिकारी अंमलदार व समुपदेशक हजर होते या कार्यक्रमात अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी भरोसा सेल यांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली.