Marmik
दर्पण

भिमान देश उचलला, पेनाच्या टोकावर…

विशाल वसंतराव मुळे – आजेगावकर

महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र आहे! एवढेच नव्हे तर ‘ब्रह्मर्षी’ या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोहोचलेला आहे. ज्या कोणा सनातनी ब्राह्मणांना आपल्या जन्मजात ब्राह्मण्याचीच घमेंड असेल, त्यांनी या कर्मजात ‘ब्राह्मणाच्या’ घरात जाऊन त्याचे शुचिर्भूत, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पहावे, म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तो बाहेर पडला, तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू!’

कोणत्याही महापुरुषांच्या संदर्भात बोलत असताना, मी एक वक्ता म्हणून, एक छोटा अभ्यासक म्हणून सांगतो आपण केलेल्या विधानाचा विपर्यास होऊ नये ह्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आणि केवळ समाजाच्या हिताचा विचार करून मानवी समाजाला कोणत्याही प्रकारची आहट पोचणार नाही ह्याची काळजी जरूर घेतली पाहिजे. विशेषतः कोणत्याही महापुरुषाला केवळ एका स्वतःच्या जातीत अडकून ठेवणे देखील परवडणार नसतं हे देखील समाजाने व वक्त्यांनी, आणि विचारवंतांनी लक्षात ठेवले पाहिजे. समाजात दुही पेरून आपला खुट्टा मजबूत करणारे बाजारू विचारवंत देखील सध्या वाढत आहेत. काही सरकारची, सरकार मधील काही व्यक्तींची अशा लोकांना साथ आहे, आणि त्यामुळे धर्मांध शक्ती समाजावर मोठ्या पद्धतीने अधिराज्य गाजवत आहेत.

अशी स्थिती सध्याची चालली असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची शिक्षण विषयक दूरदृष्टी विचारात घेतली पाहिजे. आंबेडकरांनी शिक्षण ह्या विषयावर आपलं संपूर्ण लक्ष उत्तरार्धात केंद्रीत केले आणि शिक्षणाने समाज उन्नत होतो ह्या विचारावर आंबेडकर शेवट पर्यंत ठाम राहिले… आणि आज कोणत्याही समाजात मोठ्या पातळीवर बदल घडत असतील तर त्याला शिक्षण हेच धोरण कारणीभूत आहे आणि त्याला पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची प्रेरणा आहे हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे…

महाराष्ट्राची साहित्य परंपरा प्रचंड मोठी आहे, त्यात अत्रे ह्यांचे नाव एक अदब कायम ठेऊन आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आचार्य अत्रे त्यांच्या “हार आणि प्रहार” ह्या पुस्तकात म्हणतात, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांएवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीय माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही! गोखले, भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोपासनेची पंरपरा तितक्याच तपश्चर्येने आणि अधिकाराने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो! महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र आहे! एवढेच नव्हे तर ‘ब्रह्मर्षी’ या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोहोचलेला आहे.

ज्या कोणा सनातनी ब्राह्मणांना आपल्या जन्मजात ब्राह्मण्याचीच घमेंड असेल, त्यांनी या कर्मजात ‘ब्राह्मणाच्या’ घरात जाऊन त्याचे शुचिर्भूत, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पहावे, म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तो बाहेर पडला, तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू!’ इथे कुठेही त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ब्राम्हणाशी तुलना केल्याचं माझ्या लक्षात येत नाही, अत्रे म्हणतात ते ह्या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहेत, नव्हे मी ह्या पुढे जाऊन म्हणेल “कोणताही महापुरुष हा कोणापेक्षाही , कोणत्या जातीपेक्षाही अधिक श्रेष्ठ असतो, हे कोणाला सांगायला का गरज पडावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे कार्य खऱ्या अर्थाने ह्या शतकात सर्वांच्या पुढे होते. बाबासाहेब फार पुढचा विचार करायचे, आंबेडकरांचा विचार हा विज्ञाननिष्ठ विचार आहे हे सतत दिसतं आहे.

पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक गीत लिहिल्या गेली, भारतीय नेत्यांमध्ये ते एकमेव नेते आहेत. त्यांच्यावर जेवढी लोकगीतं लिहील्या गेली त्या अगोदर आणि त्या नंतर देखील कोणावर लिहिल्या गेली नाही. त्यातील एक गीत आहे “माझा भीमान देश उचलला, एका पेनाच्या टोकावर”… आज ग्रामीण भागात गेल्यावर कळत हे गीत किती सार्थक आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेने आज ग्रामीण भागातला तरुण म्हणतोय की “कोणत्याही कलावतीचा पती केवळ प्रसाद खाऊन बुडालेला वर येत नाही”, त्या तरुणांना आता हे माहिती झालं आहे, की “कोणत्याही कलावतीचा पती अज्ञान, अंधश्रद्धा, ह्यातून बाहेर काढायचं असेल तर त्याला बाबासाहेबांच्या विचाराने संघर्षही करावा लागेल, संघटित व्हावं लागेल, आणि शिकावही लागेल. केवळ दैवावर आम्हाला राहता येणार नाही हे त्याला कळलं आहे…

बाबासाहेब आंबेडकर त्या शतकातील सर्वात मोठे व्यक्ती होते, त्याचं कारण असंही आहे. काँग्रेस ही त्या काळातली सर्वात मोठी राजकीय संस्था, आणि महात्मा गांधी हा त्या शतकातील सर्वात मोठा पुरुष. काँग्रेस आणि गांधी ह्यांच्या विरोधात जो कोणी त्या काळात गेला, एक तर तो संपलाच किंवा समाजाने त्याला स्वीकृती दिली नाही. अनेक व्यक्ती ह्या दोहोंचा विरोध करतांना खपले, पण अतिशय सक्षम, निर्भय, निर्भिड आणि निरामय व त्यांच्यातील उपजत बंडखोरवृत्तीने, त्यांच्या त्यांच्यातील ज्ञानाच्या उपासनेने टिकले ते केवळ डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरही अनेकांनी शिक्षणासाठी प्रचंड मोठे काम केले आहे. अगदी स्त्री शिक्षणासाठी देखील काम केले आहे, महर्षी कर्वे, फुले दाम्पत्य, महर्षी कर्व्यांची सूनबाई इरावतीबाईं कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पा.वा.काणे ह्यांनी देखील त्यांच्या ऐपती प्रमाणे, त्यांना झेपेल अशा हेतूने काम केले आहे. पण ह्या कोणापेक्षाही अतिशय सरस आणि प्रचंड मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी केले आहे हे मान्य करावं लागत. संत ज्ञानेश्वर ह्यांच्या पासून ते गाडगेबाबा पर्यंत समाजाने, अन्यान्य कारणाने सर्वच महापुरुषांचा छळ केला, पण आईच्या स्तनातील दुधापासून जो छळ झाला तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा झाला, आणि इतका छळ सहन करून देखील बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एकमेव महापुरुष आहेत ज्यांनी समाजक्रांती आपल्या स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिली. हे भाग्य फक्त बाबासाहेबांचे आहे. पण आज त्यांच्या अनुयायी मंडळींना आणि त्यांना आदर्श मानणाऱ्या मंडळींना त्यांना समजून घेताना खूप शिकस्त करावी लागत आहे.

महापुरुष कधीही कोणत्याही जातीचे नसतात आणि ते कोणत्याही जातीत सामावत नाहीत. ते त्यापेक्षा अधिक मोठे असतात. महापुरुषांच्या लेखी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हा कोणताही प्रकार नसतो. असलास तर तो चुकीचा विचार असतो, आणि तोच विचार पुसण्यासाठी त्यांनी आपली अख्खी हयात ह्यात घातलेली असते, आणि आपण त्यांना परत तिथच ठेवण्याचा प्रयत्न करत असू तर समाज आपल्याला माफ करणार नाही. ब्राह्मण ही जात नाही, कोणत्याही व्यक्तीने त्याचा अहंकार करण्यात अर्थ नाही, तथागत गौतम बुद्ध म्हणतात त्याप्रमाणे व्यक्ती आपल्या “कर्माने ब्राह्मण किंवा शूद्र ठरतो”. आचार्य अत्रे म्हणतात त्या प्रमाणे बाबासाहेब हे महर्षी पेक्षाही पुढचे होते, बाबासाहेबांच्या पेनाच्या टोकाच्या अधिकाराने आपण खरोखर पुनीत आहोत, त्याच योग्य वर्धन आपण सर्वांनी सांभाळलं आणि त्या शिक्षण विषयाचं विचाराला योग्य धार देऊन योग्य दिशा दिली की, कोणताही माणूस “ब्रांह्मण्याच्या” नक्की पुढे जातो…

(प्रस्तुत लेखक हे भारतीय राजकारण आणि समाजकारणाचे अभ्यासक आहेत. Mob – 9923225258)

Related posts

शाळांत आमची मुले घेता का मुले…

Gajanan Jogdand

“भारत माता पूजन;एक संस्कार…”

Mule

दंड देतो रे ‘श्रीधर’

Gajanan Jogdand

Leave a Comment