मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शासनाकडून गोरगरिबांना शिधापत्रिकेवर दिले जाणारे धान्य त्यांना न देता काळ्या बाजारात विक्रीस घेऊन जाणारा ट्रक हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडून पाच लाख 70 हजार रुपये किमतीचा तांदूळ व 20 लाख किमतीचा ट्रक असा एकूण 25 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पथक मालाविरुद्धचे गुन्हेगार तपासून व अवैध धंद्याविरोधात कार्यवाही करीत हिंगोली जिल्हा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारांकडून हिंगोली ते औंढा नागनाथ जाणाऱ्या रोडने ट्रक क्रमांक एम एच 26 बीई 2288 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून गोरगरिबांना शिधापत्रिकेवर दिला जाणारा तांदूळ काळ्या बाजारात चोरटी विक्रीसाठी जात आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ट्रक चालक नामे बलजींदर सिंग गुरुदत्तसिंग (रा. दशमेश नगर, बाफना, नांदेड) व त्याच्यासोबतचा व्यक्ती फरोज खान अहमद खान पठाण (रा. पलटण) यांना ताब्यात घेतले.
या व्यक्तींच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने 5 लाख 70 हजार रुपये किमतीचा तांदूळ व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 25 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही आरोपीं विरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने यांच्या तक्रारीवरून पुन्हा दाखल करण्यात आला.
ही कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.