मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हा पोलीस दलाकडून जातीय सलोखा व सामाजिक सदभावना उपक्रमांतर्गत 16 डिसेंबर रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पोलीस दलासह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 80 जणांनी रक्तदान केले.
हिंगोली येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस दलाकडून नेहमीच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते.
जनता व पोलीस यांच्यातील संबंध अधिक जवळचे व्हावे तसेच जातीय व सामाजिक सलोखा अबाधित राहून शांतता नांदावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सदैव प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या सदर उपक्रमांतर्गत संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर कौमी एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या रक्तपेढीमध्ये रक्ताची कमतरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनात तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढी व रक्त विघटन केंद्र यांच्या सहकार्यातून आज 16 डिसेंबर रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती नूनेवार, डॉ. कंठे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, राखीव पोलीस निरीक्षक अलीमुद्दीन शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच जिल्हा रक्तपेढी व रक्त विघटन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच हिंगोली शहरातील व जिल्ह्यातील नागरिक जिल्हा न्यायालयातील अभियोग्यता यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सदर शिबिरात एकूण 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले.