मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे गांजाची वाहतूक करणारी कार आखाडा बाळापूर पोलिसांनी पकडली यावेळी पोलिसांनी 36.30 किलो गांजासह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याच्या उद्देशाने नियमितपणे ऑल आऊट ऑपरेशन, कोंबिंग ऑपरेशन, प्रभावी नाईट पेट्रोलिंग अशा वेगवेगळ्या मोहिम राबविल्या जात आहेत.
परिणामी गुन्हेगारीचे प्रमाण कमी झालेले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून 2 डिसेंबर रोजी रात्री संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशनची मोहीम चालू होती. आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत सुद्धा ऑल आउट ऑपरेशन निमित्त विशेष पेट्रोलिंग सुरू होते.
या पेट्रोलिंग दरम्यान, आखाडाबाळापुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार हे रात्री दीड वाजेच्या सुमारास वारंगा फाटा येथे संशयित वाहन चेक करत असताना एक निळ्या रंगाची कार संशयितरित्या अतिवेगात वारंग्याकडे येऊन पोलिसांना पाहून परत हादगावकडे पळून जात असलेली दिसली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने सदर वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी ही कार पकडली.
यावेळी या वाहनांमध्ये अवैधरित्या वाहतूक करीत असलेला गांजा मिळून आला. तसेच कार मधील आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
पोलिसांनी पंचा समक्ष सदर कारची पाहणी केली असता सदर कारचे आरटीओ पासिंग क्रमांक एम एच 26 सी इ 2398 क्रमांकाची कार व एक मोबाईल तसेच 36.30 किलो गांजा मिळून आला.
सदर कार मध्ये काही कागदपत्र मिळाले असून या कागदपत्रावरून हा गांजा रवी रामराव राठोड (रा. घोडज तांडा ता. कंधार जि. नांदेड) हा वाहतूक करत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.
पोलिसांनी रवी रामराव राठोड व त्याचा एक साथीदार अशा दोन आरोपींनी विरुद्ध एमडीपीएस कायद्यान्वय गुन्हा दाखल करून एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत संदिपान शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, बाबाराव पोटे, पोलीस अंमलदार मधुकर नागरे, शेषराव जोगदंड, रामदास ग्यादलवाड, राजेश मुलगीर, विजय जाधव, प्रभाकर भोंग, वामन हिवरे, गजानन सरकटे, रोहिदास राठोड, शिवाजी पवार, होमगार्ड तसलीम प्यारेवाले, पोलीसमित्र संदीप चंद्रवंशी यांच्या पथकाने केली.