मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील कोळसा शिवारात गांजाची शेती पिकविली जात होती. सदरील गांजावर सेनगाव पोलिसांनी कार्यवाही करत एक लाख 45 हजार 500 रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची झाडे मुद्देमाल जप्त केला. सदरील प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोली चे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अवैध धंदा विरुद्ध कार्यवाही बाबत विशेष मोहीम सुरू आहे.
16 सप्टेंबर रोजी सेनगाव पोलिसांना सेनगाव तालुक्यातील कोळसा शिवारात नामे जगन्नाथ निवृत्ती वावळ (रा. कोळसा तालुका सेनगाव) याने त्याच्या हळदीच्या पिकात असलेल्या शेतात शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाचे झाडे लावली असून त्यांची जोपासना व संवर्धन करतो, अशी माहिती मिळाली.
यावरून सोनगाव पोलीस ठाणे येथील पथकाने याबाबत दोन सरकारी पंच, स्वस्तधान्य दुकानदार व तलाठी यांना सोबत घेऊन नमूद जगन्नाथ निवृत्ती वावळ हा वहीती करत असलेल्या कोळसा शेत गट नं. 108 मध्ये छापा टाकला. सदर शेतात शासनाने प्रतिबंधित केलेला गुंगीकारक वनस्पती गांजाची लहान व मोठी अशी एकूण 39 झाडे मिळून आली.
सदर झाडे उपटून त्यांचे वजन केले असता त्यांचे वजन 29 किलो 100 ग्रॅम भरले. त्यांची अंदाजे किंमत एक लाख 45 हजार 500 रुपये एवढे आहे.
शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची झाडे मुद्देमाल मिळून आल्याने घटनास्थळावरून शेतमालक जगन्नाथ निवृत्ती वावळ यास ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस यांच्या तक्रारीवरून जगन्नाथ निवृत्ती वावळ याच्या विरुद्ध गुरनं.327/2023 कलम 8 (ब) 20 (2) (क) एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस अंमलदार शेख खुद्दुस, तुळशीराम वंजारे, संदीप पवार, तुकाराम मार्कळ सर्व सेनगाव पोलीस ठाणे यांनी केली.