मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाणे अंतर्गत हापसापुर शेत शिवारात शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची शेती केली जात होती सदरील ठिकाणी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला असता 235 झाडे ज्यांचे वजन 45 किलो 60 ग्रॅम (किंमत अंदाजे 10 लाख 80 हजार रुपये) एवढा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी बाप-लेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्याकडून अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची विशेष मोहीम सुरू आहे.
या अंतर्गत हट्टा पोलीस ठाणे येथे मिळालेल्या गोपनीय बातमीदाराकडून हट्टा पोलीस ठाणे अंतर्गत हापसापुर या गावातील शेतकरी नामे गुलाब तुळशीराम सवंडकर (वय 45 वर्षे व्यवसाय शेती), आदर्श गुलाब सवंडकर (वय 25 वर्ष व्यावसाय शेती दोन्ही रा. हापसापुर ता. वसमत जि. हिंगोली) यांनी त्यांच्या शेतात अवैधरित्या शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाचे झाडे लावली आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व हट्टा पोलीस ठाणे यांच्या पथकाने याबाबत दोन सरकारी पंच व वजन काटा घेऊन हापसापुर येथील वरील आरोपींच्या कापसाच्या शेतात छापा मारला.
सदर शेतात शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची लागवड केलेली लहान व मोठी 235 झाडे जी पंचासमक्ष उपटून त्यांचे वजन केले असता वजन 45 किलो 60 ग्रॅम (किंमत अंदाजे 10 लाख 80 हजार रुपये) एवढा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून पोलिसांनी जप्त केला.
सदर घटनास्थळावरून शेतमालक आरोपी नामे गुलाब तुळशीराम सवंडकर व त्याचा मुलगा आदर्श गुलाब सवंडकर दोन्ही रा. हापसापुर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गजानन पोकळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, गणेश लेकुळे, तुषार ठाकरे व हट्टा पोलीस ठाणे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराडे, पोलीस अंमलदार जीवन गवारे, भागोराव दिंडे, आसेफ शेख यांनी केली.