(हिंगोली – शहरातील जवाहर रोडवर प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या पार्किंग कचराकुंडी झाले असून पार्किंग मध्ये साचलेला कचरा. छाया – मार्मिक महाराष्ट्र छायाचित्र सेवा)
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील नगर परिषदेने डिसेंबर महिन्यात स्वच्छतेचा ‘जागर’ घालून अनेक कार्यालयांना तसेच काही खाजगी दवाखान्यांना स्वच्छतेचा पुरस्कार वाटप केला आहे. तसेच हिंगोली शहर किती स्वच्छ आहे. याचा दिंडोरा प्रसार माध्यमात पिटला; मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगार साचले असून जवाहर रोडवर असलेल्या नगर परिषदेची पार्किंगही कचराकुंडी झाली आहे.
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण ही मन हिंगोली नगर परिषदेस तंतोतंत लागू पडते आहे. नगर परिषदेने डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा ‘जागर’ घातला. तसेच अनेक शासकीय कार्यालय आणि शहरातील काही टोलेजंग खाजगी दवाखाने यांनाही स्वच्छतेचा पुरस्कार दिला.
सदरील दवाखान्यातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन हे दवाखाने कसे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अनेक दवाखान्यातून निघणारा कचरा हा उघड्यावर जाळला जातो तर काही दवाखाने हे जैविक कचरा हा नगर परिषदेच्या कचराकुंडीच्या गाडीत टाकून मोकळे होतात.
सदरील कचरा ज्या जागेवर पोहोचतो त्या डंपिंग ग्राउंड मध्ये जैविक कचरा आढळून येतो. नगर परिषदेने शासनाकडून स्वच्छतेत पुरस्कार प्राप्त केला असून हा पुरस्कार देणाऱ्या टीमने नक्कीच येथे येऊन शहराची पाहणी केलेली नाही. शहरात कचरा व्यवस्थापनाचा व स्वच्छतेचा गंभीर विषय असून शहरातील अनेक गल्ल्याबोळ्या ह्या अस्वच्छतेने गजबजलेल्या आहेत. स्वतः हिंगोली नगर परिषदेची जवाहर रोड वर असलेली पार्किंगच कचराकुंडी झाली आहे.
स्वच्छतेचे पुरस्कार वाटणाऱ्या आणि स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणाऱ्या हिंगोली नगर परिषदेला ही बाब नक्कीच अशोभनीय असून या सर्व प्रकाराची नगररचना विभागाकडून तसेच शासनाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या वतीने करण्यात येत आहे.