मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील सर्वे नंबर 139 /1/ 3/, 140/1, 139/ 1/ 2, 139/1/4 व 133 या सर्वे नंबर मध्ये काही लोकांनी ग्रामसेवक व सरपंच यांना हाताशी धरून सदरील जमीन अकृषिक न करता गावठाण बनवून येथे प्लॉट घेणाऱ्या नागरिकांचे आणि शासनाची फसवणूक केली जात आहे. या सर्व प्रकरणी संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गट क्रमांक 139/1/4 तसेच 139/1/2 या सर्व क्रमांकामध्ये एकूण 7 एकर जमिनीत आखाडा बाळापूर सीमेजवळ कृषीक जमिनीवर अ कृषीक एन. ए. लेआउट न करता सदरील क्षेत्र गावठाण अंतर्गत येत असल्याचे दाखवत त्याजागी शासनाने दिलेल्या यु डी सी पी आर नियमावली प्रमाणे अमेनिटी स्पेस, ओपन स्पेस, रोड, नाल्या, ड्रेनेज, लाईटची व्यवस्था, अंतर्गत 30 फुटाचे रस्ते 40 फुटाचा मुख्य रस्ता व शासनाने दिलेल्या सर्व बाबींची पूर्तता न करता फक्त लेआउट टाकून ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांना हाताशी धरून सदरील जमीन मालक अलंकार संजय जगदाळे, चंद्रकिशोर देविदास घोडगे, शेख मेनोदिन शेख रहीमोउद्दीन यांनी संगणमत करत शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कृषी जमिनीला अकृषिक करण्याकरिता शासकीय रक्कम न भरताच त्या जागेवर कोणतेही विकास कामे न करता प्लॉटिंग काढलेली आहे.
सदरील जमिनीवर अनधिकृतपणे अकृषिक वापर करीत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 45 व त्या अनुषंगाने नियम आठ मधील तरतुदीनुसार दंड आकारून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील जमिनीवर एक ते 163 प्लॉट्स टाकण्यात आलेले आहेत. त्यामध्ये फक्त अंतर्गत एक 20 फुटाचा व एक 25 फुटाचा रस्ता टाकण्यात आलेला आहे.
सदरील जागेत संबंधित व्यक्तींनी शासनाने दिलेल्या नियमांचे कोणतेही पालन न करता फक्त लेआउट च्या नावाने 163 प्लॉट्स टाकलेले आहेत. शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे कृषी जमिनीला अकृषिक करणे व त्याबाबत महसूल भरणे जिल्हाधिकारी तसेच नगररचना विभाग यांच्याकडून प्लॉटिंगची मान्यता घेणे व शासनाच्या नियमाप्रमाणे त्या जागेवर विविध विकास करणे ज्यामध्ये रोड, नाली, रस्ता, लाईट, ड्रेनेज लाईन व पाण्याची व्यवस्था करून त्या जागेत खुली जागा व सुख सुविधेसाठी त्या जागेचे 7/12 उताऱ्यानुसार एकूण क्षेत्र विचारात घेऊन 10 टक्के मोकळी जागा व 10 टक्के सुख सुविधेसाठी ची जागा, तसेच विनियम 3,4,1 (i) मध्ये (a), (b), (c) असे विविध नियम घेऊन मंजुरी घ्यावी लागते.
शासनाला महसूल देऊन ज्या लोकांना प्लॉट विक्री करीत आहेत. त्यांना योग्य सुख सुविधा देण्याचे काम प्लॉटिंग धारकांचे आहे. असे असतानाही प्लॉटिंग टाकणाऱ्या मालकांनी शासनाचे सर्व नियम डावलून शेवाळा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंच यांना हाताशी धरून सदरील लेआउट मंजूर करून घेतलेले आहे.
सदरील जमीन ही आखाडा बाळापूर सीमेलगत येत असून व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गावठाण नाही तरीही त्यांना गावठाण प्रमाणपत्र देण्याचे काम ग्रामपंचायत करत आहे. एकूण जवळ जवळ 7 एकर मध्ये प्लॉटिंग टाकण्यात आलेले असून त्यामध्ये फक्त लेआउट टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे जनतेची व शासनाची फसवणूक होत आहे. तसेच शासनाच्या लाखो रुपयांचे महसुलावर पाणी फिरले जात आहे.
या सर्व प्रकरणी संबंधितांवर महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 45 व त्या अनुषंगाने नियम 8 मधील तरतुदीनुसार दंड आकारून संबंधित जागेचा गट क्रमांक सर्वे क्रमांक 139 /1/2 तसेच 139/1/4 शेवाळा ग्रामपंचायत या प्लॉटिंग मध्ये ओपन स्पेस, अमेनिटी स्पेस, रोड, नाल्या, ड्रेनेज व लाईटची व्यवस्था करून घ्यावी. तसेच याबाबत चौकशी समिती गठित करून संबंधितांविरुद्ध फौजदारी कार्यवाही करावी अन्यथा आमरण उपोषण व आंदोलन करून योग्य न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर संकल्प बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक गजानन जोगदंड यांची स्वाक्षरी आहे.