मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात पुरवठा विभागातील रास्तभाव दुकानदारांची धान्य वाटप कामकाजातील उदासिनता दूर करुन पात्र लाभार्थ्यांना विहीत वेळेत धान्य पुरवठा करण्यासाठी तसेच दिरंगाईखोर रास्तभाव दुकानदारांवर प्रशासनाचा वचक बसविण्याकरीता दि. २८ मार्च, २०२५ रोजी सेनगाव तालुक्यातील माझोड येथील अत्यंत कमी धान्य वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानाला जिल्हाधिकारी यांच्या पथकाने अचानक भेट देवून तपासणी केली.
या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींमुळे तात्काळ प्रभावाने निळोबा पांडुरंग मुळे यांच्या नावे असलेला मौ. माझोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला.
या कारवाईच्या वेळी जिल्हाधिकारी यांच्या पथकातील जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे, महसूल सहाय्यक पी.व्ही. काळबांडे तसेच ग्रा.म.अ. एन.जी.ढोले हे उपस्थित होते.
तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यात सुद्धा अशाच प्रकारच्या कुचकामी रास्तभाव दुकानदारांवर अचानक भेटी देवून कारवाई करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसिलदारांना दिल्या आहेत.