मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तात्काळ पोलीस मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने विनाशुल्क डायल 112 हा हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून दिला आहे. मात्र सदरील नंबर वर खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध हिंगोली तालुक्यातील बासंबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना संकटकालीन तात्काळ पोलीस मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने विनाशुल्क 112 हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. संकटकाळी पोलीस मदतीसाठी 112 वर डायल केल्यास तात्काळ पोलीस मदत पोहोचते.
10 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बासंबा पोलीस ठाणे येथे 112 मार्फत कॉल आला की, कॉल करणाऱ्याच्या पत्नीस व दोन वर्षाच्या मुलीला मिळण्याने अपहरण करून नेले आहे, अशा पद्धतीने कॉल आल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी हे तात्काळ पोलीस स्टाफसह खानापूर चित्ता येथे पोहोचले. यावेळी सदरील ठिकाणी कोणत्याही महिलेचे व मुलीचे अपहरण झाले नसल्याचे समजले.
कॉल करणारा इसम नामे बालाजी नागोराव चंद्रवंशी (वय 28 वर्षे रा. खानापूर चित्ता) हा दारू पिलेल्या अवस्थेत पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे लक्षात आले.
यावरून पोलिसांना खोटी माहिती देणारा आरोपी नामे बालाजी नागोराव चंद्रवंशी (वय 28 वर्ष रा. खानापूर चित्ता) याच्या विरुद्ध बासंबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
डायल 112 ही तात्काळ पोलीस मदतीसाठी उपलब्ध करून दिलेली हेल्पलाइन आहे. यावर विनाकारण कॉल करून खोटी माहिती दिल्यास किमान सहा महिने कारावासाची शिक्षा व आर्थिक दंड होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच डायल 112 वर कॉल करून पोलीस मदत मागावी असे आवाहन करण्यात आले आहे.