मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार : –
हिंगोली – जिल्ह्यात आजपर्यंत 8 लाख 50 हजार 992 लाभार्थ्यांना पहिला डोस, 7 लाख 46 हजार 31 लाभार्थ्यांना दुसरा डोस आणि 41 हजार 397 लाभार्थ्यांना बूस्टर डोस याप्रमाणे एकूण 16 लाख 38 हजार 420 लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले आहे.
सध्या देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने वयोगट 18 वर्षे ते पुढील वयोगटातील नागरिकांना प्रिकॉशन डोस मोफत देण्यात येत आहेत. दुसरा डोस घेतल्यानंतर प्रिकॉशन डोस घेण्यासाठी सहा महिन्यापर्यंत अंतर आहे.
जिल्ह्यात प्रिकॉशन डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांसाठी शहरातील नगरपालिका आरोग्य केंद्र, जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालयात ही लस देण्यात येत आहे.प्रिकॉशन डोससाठी येताना नागरिकांनी दोन डोस घेतलेली प्रमाणपत्र नोंदणी करुन मोबाईल सोबत आणावे. जिल्ह्यात प्रिकॉशन डोसचा पुरेसा साठा शिल्लक आहे. ऑनलाईन नोंदणी व थेट केंद्रावर येऊनही नागरिकांना प्रिकॉशन डोस घेता येईल.
थेट केंद्रावर जिल्ह्यातील नागरिकांना प्रिकॉशन डोस देणे चालू असून लसीचा साठा उपलब्ध आहे. प्रिकॉशन डोस घेण्यापूर्वी त्या नागरिकाने दुसरा डोस घेऊन सहा महिने झाले का हे तपासले जाणार आहे. नागरिकांना प्रिकॉशन डोस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी तसेच थेट केंद्रावर येण्याचा पर्याय खुल्ला असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे आणि स्वत:ला सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
या कोविड लसीकरण मोहिमेची व आरोग्य विभागातील विविध योजनांची ग्रामस्तरावर जाऊन जास्तीत जास्त जनजागृती करण्यासाठी दि. 3 ऑगस्ट, 2022 रोजी मुंबई येथील आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, उपसंचालक आयईसी डॉ.कैलास बाविस्कर, सहाय्यक संचालक डॉ.कमलापूरकर, डॉ.महेंद्र जगताप, युनिसेफच्या राजेश्वरी चंद्रशेखर, ऋतिका यांच्या उपस्थितीत युनिसेफ मार्फत मेघाफोन, लाऊड स्पीकर इत्यादी आय ई सी साहित्य देण्यात आले आहे.