मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – पर्यटन व संस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन, वन विभाग, उगम ग्रामीण विकास संस्था, आणि सर्व समविचारी संस्था हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला अभियानंतर्गत कयाधू/ आसना नदी पुनर्जीवन संवाद यात्रेला जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवली आहे.
संवाद यात्रेला दि. ११ मार्च पासून सुरुवात होणार असून कयाधू व आसना नदी काठावरील १८ गावातून यात्रा जाणार आहे. यामध्ये ३६५ गावांचा समावेश असणार आहे तर एकूण १३७ किमी अंतरांची ही यात्रा असणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, संवादयात्रेमध्ये वनविभाग, नदीप्रहरी व नदी समन्वयक यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या मार्फत ही यात्रा निघणार आहे. गावामधील शेतकरी, भूमिहीन, महिला, पुरुष, युवक-युवती व विद्यार्थी यांच्या सोबत चर्चा करण्यात येणार आहे.
नदी पुनरुजीवीत करण्यासाठी वयोवृद्धांसोबत चर्चा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नदीचा प्रवाह कसा बदलत गेला आणि त्याचा आढावा घेता येईल आणि त्यानुसार कृती आराखडा तयार करता येइल.
जयाजी पाईकराव यांनी नदीचे होत असलेले शोषण कसे थांबवता येईल यावर यात्रेमध्ये मांडणी करण्यात येणार आहे. तसेच प्रदूषण कमी करणे, अतिक्रमणाचे प्रमाण कमी करून नदीला अमृतवाहिनी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सुशांत पाईकराव यांनी संवाद यात्रेची रूपरेषा मांडणी यामध्ये संवादयात्रा ११ तारखेपासून सुरुवात होणार असून २८ तारखेला संपन्न होणार आहे तर आसना नदीकाठावरील शिरडशहापूर येथून प्रारंभ होणार असून चोंढी, कुरूंदा व असेगाव ह्या मार्गी जाणार आहे तर कयाधू नदी काठावरील जयपूर, कोळसा, सेनगाव, ब्रम्हपुरी, नर्सी नामदेव, देऊळगांव रामा, बेलवाडी, समगा, वसई, नांदापूर, कोंढुर, येळकी, आखाडा बाळापुर मार्गे जाणार आहे व शेवाळा येथे संवाद यात्रेचा समारोप होणार आहे.
संवादयात्रेसाठी चित्ररथ तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांनी केले. तसेच कयाधू नदीचे पाणी असलेला कलश बालाजी नरवाडे यांना हस्तांतरीत करण्यात आला असून हा कलश पुढे नांदेड तालुक्यातील प्रतिनिधिना देण्यात येणार तर कयाधू नदीचा कलश पुढे हदगाव तालुक्यातील प्रतिनिधीना देण्यात येणार आहे.
संवाद यात्रेमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, संजय नाकाडे, किशन लखमावर, जिल्हा कृषी अधिकारी, सुशीला पाईकराव, विकास कांबळे, धनंजय पडघन, बालाजी नरवाडे, धम्मपाल दांडेकर, आकाश मोगले, दा. मु. मोगले, दिशांत पाईकराव उपस्थित होते.