मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून गंभीर गुन्हे करणारा व सतत गुन्हे करणारा हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर जवळा पळशी रोड येथे राहणारा 23 वर्षीय डीजे चालकास एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एमपीडीए कायदे अंतर्गत केलेली ही 22 वी कार्यवाही आहे.
देवानंद उर्फ सोनू पिता शिवाजी जाधव (वय 23 वर्षे व्यवसाय डीजे चालक, रा. सिद्धार्थनगर, जवळा पळशी रोड हिंगोली) याच्यावर मागील अनेक वर्षापासून हिंगोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्धचे एकूण 5 गुन्हे दाखल होते.
सदरील युवक हा सतत गुन्हे करत होता. तो समाजासाठी धोकादायक बनला होता. त्याच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तो गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने सामाजिक स्वास्थ्यास आणि सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक व्यक्ती बनला होता.
म्हणून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सदर प्रकरण पोलीस निरीक्षक विलास पाटील (शहर पोलीस ठाणे) यांनी उपविभागी पोलीस अधिकारी उपविभाग (हिंगोली शहर) प्रशांत देशपांडे यांच्या मार्फतीने नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, (व्हिडिओ पायरेट्स) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 एमपीडीएचे कलम 3(1) अन्वय कार्यवाहीचा प्रस्ताव हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता.
पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रस्ताव हिंगोली जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठविला होता.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करून नमूद धोकादायक व्यक्ती देवानंद उर्फ सोनू पिता शिवाजी जाधव (वय 23 वर्षे डीजे चालक रा. सिद्धार्थ नगर जवळा पळशी रोड हिंगोली) हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरवून धोक्कादायक व्यक्ती बनल्याने त्यास एमपीडीए 1981 (सुधारणा 1996, 2009 आणि 2015) कलम 3(1) अन्वये एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहे.
नमूद स्थानबद्ध इसमास ताब्यात घेऊन जिल्हा मध्यवर्ती कारागृह परभणी येथे दाखल करण्यात आले आहे.