Marmik
Hingoli live

यंदाच्या गणेशोत्सवातून डॉल्बी हद्दपार! वापरावर जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – यंदाच्या गणेशोत्सवातून डॉल्बी हद्दपार होणार आहे. डॉल्बी मुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाने समाजातील वयोवृद्ध, गरोदर महिला व लहान मुले यांना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बी वापरावर बंदी घातली आहे.

हिंगोली शहरात व जिल्ह्यात दि. 31 ऑगस्ट, 2022 ते दि. 9 सप्टेंबर, 2022 दरम्यान मोठ्या प्रमाणात श्री गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या श्री गणेश उत्सव काळात गणेश विसर्जन दरम्यान डॉल्बी सिस्टीम लावून मिरवणुका काढण्यात येतात.

या डॉल्बी सिस्टीमच्या आवाजामुळे वयोवृध्द, गरोदर महिला व लहान मुले यांना त्रास होतो. या डॉल्बी सिस्टीम चालक व यांना प्रत्येक वर्षी पर्यावरण कायदा कलम 8 देऊन मिटींगमध्ये समोपदेशन करुनही त्यांच्यावर काहीएक परिणाम झाला नसून वर्षातील शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, गणेश उत्सव, दहीहंडी, नवरात्र महोत्सव इत्यादी उत्सवामध्ये डॉल्बी सिस्टीम लावून मिरवणूका काढण्याचा प्रयत्न करतात.

डॉल्बी सिस्टीम चालक व मालक हे प्रत्येक उत्सवाचे मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम लावून पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करत आहेत. तसेच डॉल्बी सिस्टीमच्या आवाजामुळे आजारी व सर्वसामान्य नागरिक यांच्या कानास , हृदयास, आरोग्यास तसेच जिवितास धोका होण्याची शक्यता आहे. मालमत्तेची हानी सुध्दा पोहचण्याची शक्यता असल्याने सर्वांमुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन करण्यासाठी उच्च न्यायालय, मुंबईमध्ये दाखल जनहित याचिका क्र. 152/2010 वर न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊन ध्वनी प्रदूषण (नियंत्रण नियमन) अधिनियम 2000 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदीनुसार आदेश पारित केले आहेत.

या आदेशाचे पालन करतेवेळी पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये संघर्ष होऊन तणावाची परिस्थिती निर्माण होते. प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

या अनुषंगाने गणेश आगमन व विसर्जन मिरवणुका तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, नवरात्र, रामनवमी, दहीहंडी, शिवजयंती वेळी ध्वनी प्रदूषण अंमलबजावणी करतेवेळी आगामी नगर परिषद , जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षामध्ये गणेश मंडळांनी डॉल्बी लावावी यासाठी पाठिंबा देऊन पुढाकार घेऊ शकतात.

त्यामुळे डॉल्बी लावण्यावरुन मंडळाचे पदाधिकारी, राजकीय पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी ऐनवेळी डॉल्बी सुरु करण्यासाठी हट्ट धरुन परिस्थिती तणावपूर्ण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गणेश उत्सवाच्या काळात जिल्ह्यातील डॉल्बी चालक व मालक यांच्याकडे असलेल्या डॉल्बी सिस्टीम उत्सव कालावधीत रोखून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे या डॉल्बी सिस्टीम कब्जा असलेल्या ठिकाणाच्या जागेवरच सिलंबद करुन प्रतिबंध करण्यासाठी किंवा डॉल्बी सिस्टीम मालक व चालक हे डॉल्बी सिस्टीम वापरात उपभोगात आणू नये यासाठी डॉल्बी सिस्टीम मालक व चालक यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) अन्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन दि. 31 ऑगस्ट, 2022 चे 00.00 वाजेपासून ते दि. 9 सप्टेंबर, 2022 चे 24.00 वाजेपर्यंत गणेश उत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीम वापरात आणू नये यासाठी डॉल्बी सिस्टीम मालक व चालक यांना बंदी घातली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितावर नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी  आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही आदेशात नमूद केले आहे.

Related posts

भांग पिऊन विभागीय वन अधिकारी कार्यालय करतेय काम!

Gajanan Jogdand

रस्ता सुरक्षा अभियानात एकास रस्ता चिरडले; अभियानाला लागला रक्ताचा धब्बा

Gajanan Jogdand

सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 4 टवाळखोरांवर दामिनी पथकाकडून कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment