Marmik
Hingoli live

लंपि स्कीनला घाला आळा! पशुपालकांनो आपले पशुधन सांभाळा!!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – लंपी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे गाई व म्हशीमध्ये आढळून येतो. सर्व वयोगटातील नर व मादी जांनावरांमध्ये हा आजार आढळून येतो. उष्ण व दमट हवामान (कीटकांची वाढ जास्त प्रमाणात ) रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. आजारामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावर अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. वेळीच उपाययोजना नाही केल्यास मरतुक होते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते.

लंपे स्किनला घाला लंबी स्किनला घाला या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माशा (स्टोमोकसिस ) , डास (एडीस), गोचीड, चिलटे (क्यूलीक्वाईड्स) यांच्यामार्फत होतो. तसेच या आजाराचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होतो.           

भारतात या रोगाची पहिली नोंद ऑगस्ट, 2019 मध्ये ओरिसा राज्यात झाली. तर राज्यात या आजाराचा प्रसार मार्च, 2020 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे दिसून आला आहे.           

राज्यात सन 2022-23 मध्ये जळगाव, अकोला, पुणे, नगर, औरंगाबाद, लातूर व बीड जिल्हयात गाय व म्हैस वर्गीय जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात लंपी चर्म रोगास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने विशेष सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. पशुपालकांनी आपल्या पशुधनाची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला लंपी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल.लंपी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे :बाधित जनावरामध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2-5 आठवडे एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. सुरुवातीस भरपूर ताप येतो. चारा खाणे, पाणी पिणे कमी अथवा बंद होते. दूध उत्पादन कमी होते.

 त्वचेवर हळूहळू 10-20 मिमी व्यासाच्या गाठी येतात. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह व स्तनदाह आजाराची बाधा पशुमध्ये होऊ शकते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते.पशुपालकांनी घ्यावयाची काळजी :तापीच्या कालावधीमध्येच जनावरास उपचार होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चारा कमी खाणाऱ्या जनावराचा तात्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावा.

बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डास, माशा, गोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करुन बंदोबस्त करणे.

तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येऊ नयेत म्हणून औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे. आजारी जनावरांवर विषारी औषध फवारणी करु नये. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करणे.

त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम 4(1) अन्वये पशूंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.           

लंपी स्कीन डिसीजचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालक तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करणे व शंकाचे निरसन करणे यासाठी जिल्हास्तरीय  नियंत्रण कक्ष, तसेच तालुक्यामध्ये पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती सर्व तालुके यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.           

जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षामध्ये संपर्कासाठी सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.दिनेश टाकळीकर (मो. 9881480083), पशुधन विकास अधिकारी डॉ.जी.जे. खान (मो. 9922722994), पशुधन विकास अधिकारी डॉ.सिध्दार्थ इंगोले (मो.9960034358) यांची नेमणूक करण्यात आली आहे.           

तालुकास्तरीय नियंत्रण कक्षामध्ये हिंगोली तालुक्यासाठी डॉ.सिध्दार्थ इंगोले, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो.9960034358) यांची, वसमत तालुक्यासाठी डॉ. संजय सावंत, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9552767896), कळमनुरी तालुक्यासाठी डॉ.नंदकिशोर जाधव, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9960784664), औंढा नागनाथ तालुक्यासाठी डॉ.संदीप नरवाडे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9595758512) व सेनगाव तालुक्यासाठी डॉ.संजय सावंत, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती (मो. 9552767896) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

लंपी स्कीन या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. 1800 233 0418 अथवा मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा टोल फ्री क्र. 1962 वर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related posts

हिंगोली रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी 19.50 कोटी; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला नागरिकांशी संवाद

Santosh Awchar

मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी लुटले वान, जिल्हाभरात संक्रात सण उत्साहात साजरा

Gajanan Jogdand

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

Gajanan Jogdand

Leave a Comment