मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा पोलिस दलात प्रभावीपणे पोलिस पेट्रोलिंग होण्यासाठी तसेच गंभीर गुन्हे चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात ई-बिट प्रणाली हा उपक्रम राबविला जात आहे.
सदर ई बीट प्रणाली ही सुभाहू कंपनीच्या मोबाईल ॲप असून ई बीट प्रणाली ही खास प्रभावी पोलीस पेट्रोलिंग साठी सुरू करण्यात आले आहे. सदर प्रणालीचा मुख्य उपयोग रात्रगस्त करणारे अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी आहे. ज्या भागात पोलिस पेट्रोलिंग करायचे आहे त्या भागात पॉइंट निश्चित करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात एकूण 13 पोलिस ठाणे अंतर्गत 1100 पेक्षा अधिक ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. ज्यात महत्त्वाचे संवेदनशील ठिकाणे, बाजारपेठ परिसर, चोरीच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणारे ठिकाणे, धार्मिक स्थळे व इतर आवश्यक ठिकाणांचा समावेश आहे. या भागात रात्रगस्त करणारे अधिकारी किंवा अंमलदार सदर ठिकाणी भेट दिल्यानंतर ई बिट ॲप द्वारे भेट दिल्या बाबत नोंद करता येणार आहे.
तसेच पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचेही नोंदी या ॲपमध्ये घेता येणार आहेत. त्यांनाही या ॲप द्वारे चेक करण्याची सुविधा आहे. यापूर्वी रात्रगस्त मध्ये प्रत्येक ठिकाणी भेट बुक ठेवले जात होते. आता भेट बुक ठेवण्याची आवश्यकता नाही तर निश्चित केलेले महत्त्वाचे ठिकाणे रात्रगस्त पेट्रोलिंग वरील अंमलदार सदर ठिकाणी भेट देतील तेव्हा सदर ॲप मध्ये त्याची नोंद होणार आहेत.
या ॲप मध्ये इतरही अनेक सुविधा आहेत जसे चोरीची वाहने तपासणी पासपोर्ट हत्यार लायसन्स आदी सुविधा भविष्यात पुरविल्या जाणार आहेत.
बाहेरगावी जाणार्या नागरिकांच्या नोंदी घेता येणार
सदर ई बीट प्रणालीमध्ये नागरिकांसाठी इतरही सुविधा देण्यात आल्या आहेत. जे नागरिक जास्त दिवसासाठी घर बंद करून बाहेरगावी जातात त्यांची माहिती जवळच्या पोलिस ठाण्याला दिल्यास त्याबाबत या ॲप मध्ये नोंदी घेता येणार आहेत आणि याद्वारे सदरचे बंद घर पोलिसांकडून वेळोवेळी चेक केले जाईल व चोरीसारख्या घटनांना आळा बसेल.