मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – स्थानिक विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सेनगाव विधानसभा मतदार संघात सेनगाव पासून अवघ्या काही अंतरावर श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एआरटीएम इंग्लिश स्कूल मध्ये सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली पालकांना गंडवण्याचे काम सुरू आहे.
या विरोधात ‘मार्मिक महाराष्ट्र’कडून वेळोवेळी प्रकाश टाकूनही कोणतीही कार्यवाही केली जात नाहीये. या प्रकरणात आता विकासशील आमदार तानाजी मुटकुळे यांनी तरी लक्ष देऊन पालकांची होणारी फसवणूक थांबवावी, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात विकासशील आमदार म्हणून तानाजी मुटकुळे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या हिंगोली सेनगाव विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली जात आहेत;मात्र त्यांच्या मतदारसंघात श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एआरटीएम इंग्लिश स्कूल कडून शिक्षणाचा काळाबाजार केला जात आहे. या शाळेकडून सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली पालकांकडून हजारो रुपये शुल्क आकारले जात आहेत.
विशेष म्हणजे शाळेचे शिक्षक खेड्यापाड्यात जाऊन पोम्प्लेट वाटत असून पालकांनी आपल्या पाल्याचा या शाळेत करावा म्हणून सीबीएससी पॅटर्नची भूल घातली जात आहे.
मागील दोन ते तीन वर्षापासून या शाळेकडून शिक्षणाचा हा बाजारू उद्योग सुरू असून याकडे शिक्षण विभागाचे ही दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मार्मिक महाराष्ट्र समूहाकडून या विरोधात वेळोवेळी तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे या शाळेने सदरील इंग्लिश स्कूल ही तोष्णीवाल महाविद्यालयास मिळालेल्या मुलींच्या वसतिगृहात थाटली आहे! विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान तेवढे घेऊन मुलींना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्या या वसतिगृहात ही शाळा काढून बाजारू उद्योग सुरू केलेला आहे!
या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि शिक्षणाचा बाजारू उद्योग मोठ्या जोमाने करणाऱ्या या शाळेच्या संचालकांवर कारवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.