हिंगोली : संतोष अवचार
मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र सण बकरी ईद निमित्त हिंगोली शहरातील वाहतुकीचे मार्ग काही काळ बदलण्यात आले आहेत. याबाबत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्र काढले आहे.
10 जुलै रोजी हिंगोली शहरात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. या निमित्त ईदगाह मैदान येथे नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा होण्याची शक्यता असल्याने व सदर सण शांततेत तसेच रहदारीस कोणताही अडथळा निर्माण न होता साजरा व्हावा व शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी त्यांच्याकडील प्राप्त अधिकारानुसार 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत हिंगोली शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत.
यानुसार नांदेड नाका, एनटीसी गेट, बस स्टॅन्ड पुर्वेकडील गेट, 52 खोली रोड, संभाजी शाळेजवळील रोड येथून इदगाहकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असून कयाधू नदीकडून नांदेड नाका कडे येणारा रोड ही पूर्णपणे बंद असणार आहे नरसी t-point खटकाळी बायपास अकोला बायपास येथून हिंगोली शहरात येणारी सर्व जड वाहनास प्रवेश बंद आहे. तर हिंगोली शहरातून औंढा नागनाथ सेनगाव कडे जाण्यासाठी इंदिरा चौक, गांधी चौक, फुलमंडी, गोदावरी कॉर्नर, मेहराजुलूम मस्जिद, खाकीबाबा चौक, कबरस्तान, कयाधू नदी पूल, नरसी सिटी पॉइंट, हिंगोली शहरातून नांदेड कडे जाण्यासाठी इंदिरा चौक, नांदेड नाका, रेल्वे गेट, खटकाळी बायपास, उमरा पाटी जड वाहतूक वाशिम कडून नांदेड कडे जाण्यासाठी अकोला बायपास ते खटकाळी बायपास मार्गे नांदेड, नरसी कडून येणारे जड वाहतूक नरसी टी पॉइंट वरून औंढानागनाथ कडे, आंबेडकर चौक, गांधी चौक, इंदिरा चौक, नांदेड नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता वाहतुकीस चालू राहणार आहे.
याप्रमाणे वाहतूक मार्गात बदल केलेला असून सूचना व आदेशांचे पालन करून प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले आहे.