हिंगोली : गजानन जोगदंड /-
येथील नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधे शूज आणि हॅन्ड ग्लोजहि दिलेले नसल्याचे दिसते. हे कर्मचारी बिना सेफ्टी चे नाल्यात उतरून मैला व नाल्यातील घाण उपसत आहेत. त्यामुळे स्वच्छतेत प्रथम पुरस्कार पटकावणाऱ्या या नगर परिषदे च्या कारभाराचा सुज्ञ नागरिकांतून निषेध केला जात आहे.
हिंगोली नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात देशात पारितोषिक पटकावले आहे. काही कोटीचा पुरस्कार मिळविलेल्या या नगरपरिषदेने आपल्या कार्याचा डंका तेवढा पिटवून घेतला, खरे चित्र मात्र वेगळेच आहे. शहरात जागोजागी कचरा साचलेला दिसून येतो. शहरातील काही ठिकाणे कचरा व दुर्गंधीने व्यापून गेलेली असून कचऱ्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असतानाच नगरपरिषदेने हाती घेतलेल्या मान्सून पूर्व कामांमध्ये स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्याकडे देखील दुर्लक्ष केल्याचे दिसते. नगर परिषदेकडून देवडा नगर व इतर काही भागात केलेल्या नालेसफाईच्या कामात स्वतःच्या कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज व शूज विना नाल्यात उतरून त्यांच्याकडून मैलावर नाल्यांची साफसफाई करून घेतली आहे. याबाबतचा व्हिडिओ मार्मिक महाराष्ट्र कडे आला असून यामध्ये हे कर्मचारी कोणतीच खबरदारी न घेता काम करताना दिसत आहेत. नगरपरिषदेच्या या अशा वागणुकीचा मार्मिक महाराष्ट्र सह शहरातील अनेक नागरिकांकडून निषेध केला जात असून मानव अधिकार कार्यकर्त्यांनीही पुढे येऊन याबाबत नगरपरिषदेला जाब विचारण्याची गरज आहे.
मिळालेल्या पुरस्कार निधीचे काय झाले?
हिंगोली येथील नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात काही कोटीचा पुरस्कार मिळविला. या पुरस्कारातून नगरपरिषदेने कोणती भरीव कामगिरी केली तसेच कोणते भरीव कार्य केले. याबाबत प्रसार माध्यमांना ही माहिती नाही. नगर परिषदेने या निधीतून काही ठिकाणी स्वच्छतागृह उभारल्याचे दिसते. अवघ्या काही ठिकाणी ही स्वच्छतागृह उभारून उर्वरित निधी चे केले काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे.