मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी आदर्श महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा ऱ्हास आणि वृक्षारोपण याबाबत सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी एनसीसी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून बुधवार रोजी (5 जून) हिंगोली वन विभागाच्या वतीने शहरातील आदर्श महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी उपस्थित एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा ऱ्हास आणि वृक्षारोपणाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर वृक्षारोपणाशिवाय गत्यंतर नाही. प्रत्येकाने आपल्या घर परिसरात किमान एक तरी झाड लावून ते जगविले पाहिजे. पृथ्वीवर झाडांच्या आच्छादना खालील क्षेत्र कमी झाल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे.
जागतिक तापमान वाढ हा विषय ही गंभीर झाला असून आपणास शुद्ध हवा मिळण्यासाठी झाडे लावणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच झाडे लावून ती जगविण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले.
याप्रसंगी आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य आघाव, मुख्याध्यापिका सोनावणे, एनसीसी ऑफिसर घुगे, ढाले आदींची उपस्थिती होती. यावेळी एनसीसी विद्यार्थ्यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने एनसीसी चे विद्यार्थी तसेच आदर्श महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हिंगोली वन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.